ऑनलाईन टीम / पुणे :
तथाकथित वैज्ञानिक, नोकरशहा आणि काही राजकीय नेतृत्व हेच भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनावर विश्वास ठवत नसल्याने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रज्ञ जे संशोधन करीत असतात त्यापासून समाज वंचित राहतो. तथाकथित वैज्ञानिक, अंधश्रद्धा आणि अविश्वास या जोखडात भारतीय संशोधन अडकून पडल्याची खंत भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे मुख्य संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केली.
येथील दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुणे (डिकाई), अवनि आणि रिसर्च अँड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन (रांचो) यांच्या संयुक्त विद्यमाने सर सी.व्ही. रमण पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. राजेंद्र जगदाळे बोलत होते. आत्मनिर्भर भारत सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर, ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक डॉ. विठ्ठल बांदल, दिव्यांगता सहायता केंद्राचे संशोधक व समन्वयक धनंजय भोळे, ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक व्ही.एम. कुलकर्णी आणि युवा संशोधक अंकिता नगरकर यांना सर सी.व्ही. रमण संशोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले की, मूळ भारतीय विद्यार्थी सिलीकॉन व्हॅलीत गेल्यानंतरच त्यांचे कर्तृत्व का सिद्ध होते हा आत्मचिंतनाचा विषय आहे. भारतात शास्त्रज्ञांना संशोधनाला पूरक सुविधा आणि वातावरण मिळत नाही. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना संशोधकांची आणि शास्त्रज्ञांची आठवण झाली. आयसर, आयआयटी यासारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून आपण केवळ पाश्चात्य देशांसाठी संशोधक तयार करीत आहोत. पीएचडी नंतर संशोधनाच्या संधी किंवा मार्ग उपलब्ध करून दिले नाहीत, तर भारतात रांचो कसे तयार होतील, हा प्रश्नच आहे. आपल्या भारतात संशोधक कमी नाहीत, परंतु इंडस्ट्रीचा देखील ते संशोधक आणि त्यांच्या संशोधनावर विश्वास बसत नाही, हे खेदजनक आहे.








