तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ने सन्मानित झालेले मूळचे बार्शीचे रणजितसिंह डीसले यांची आज कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यांच्यासह त्यांची पत्नी निशिगंधा डिसले यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर त्यांचे आई-वडील भाऊ व इतर कुटुंबीयांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे. आज या सर्वांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट केली आहे तर आर्टीपीसीआर टेस्ट साठी त्यांचे स्वॅब सोलापूर प्रयोग शाळेत पाठवले आहे. तरी आरोग्य विभागाने रणजितसिंह डीसले यांना व त्यांच्या कुटुंबांना घरातच अलगीकरण राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्लोबल टिचर अवॉर्ड हा जगातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम समजला जाणारा सन्मान डिसले यांना मिळाल्या नंतर जगभर व देशभर त्यांच्या कार्याची चर्चा चालू आहे. त्यातच त्यांना शासकीय सर्व अधिकारी व राजकीय नेते यांनी त्यांच्या घरी येऊन भेट दिली होती. तर रणजितसिंह डीसले हे सोमवार व मंगळवार मुंबई दौऱ्यावर असताना अनेक महत्त्वपूर्ण राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. रणजीतसिंह डीसले यांना त्यांच्या सन्मानाबद्दल सत्कार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने खास निमंत्रण देऊन मुंबईला बोलावले होते. यावेळी त्यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला आहे. तर त्यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये अनेक शिक्षणाधिकारी त्यांचा चाहतावर्ग, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या भेटी घेतलेले आहेत तर त्यांच्यासोबत बार्शीतून त्यांचे मित्र नातेवाईक सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी हे ही गेले होते सध्या रणजीतसिंह डीसले यांची प्रकृती स्थिर असून कोणतेही काळजीचे कारण नाही असे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Previous Articleसांगली : बँक कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा
Next Article सांगली : ‘भाषा सुधारा अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ’









