नगरसेवक जांभळे यांनी इशारा देताच पालिकेच्या बांधकाम विभागाचे डोळे उघडले
सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरात मुख्य रहदारीचा व दळणवळणाचे रस्ते म्हणून राजवाडा ते बोगदा, समर्थ मंदिर ते शाहु चौक हे दोन ओळखले जातात. त्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे बुजवले जात नव्हते. पॅचिंग करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष केले जात होते. त्यावरुन नगरसेवक धनंजय जांभळे यांनी इशारा देताच बांधकाम विभागाचे डोळे उघडले अन् कामाला प्रारंभ झाला.
राजवाडा ते समर्थ मंदिर, समर्थ मंदिर ते बोगदा आणि समर्थ मंदिर ते शाहु चौक या रस्त्यावर ठिकठिकाणी नळ कनेक्शन दुरुस्त्यावर इतर कारणाने खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे न भरल्याने वाहनधारकांचे आणि सातारकरांचे हाल होत असल्याच्या तक्रारी साततत्याने होत होत्या. त्याबाबत पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नगरसेवक धनंजय जांभळे यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभाग खडबडून जागा होवून आज प्रत्यक्ष रस्त्याच्या खड्डे पॅचिंगच्या कामाला प्रारंभ झाला. राजवाडा ते गोल मारुती मंदिर, मिरेकर चौक ते समर्थ मंदिर, समर्थ मंदिर ते बोगदा असे काम सुरु करण्यात आले आहे. ते काम जांभळे स्वतः उभे राहून करुन घेत आहेत.









