प्रतिनिधी/ कराड
शेतकरी हिताच्या विरोधातील कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला कराड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी 3 पर्यंत शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद होती. सर्वसामान्य विक्रेत्यांसह व्यापारी वर्गाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे दिसून आले.
सकाळी अकराच्या सुमारास बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन करून शहरात रॅली काढण्यात आली. दुचाकी घेऊन शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. दत्त चौक, चावडी चौक, कन्या प्रशाला, कृष्णा नाका, बसस्थानक मार्गे काढलेल्या या रॅलीने शहरात बंदचे आवाहन केले. त्यानंतर प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. बळीराजा संघटनेचे केंदीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, अनिल घराळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मंगळवारी कराडच्या व्यापारी पेठेचा साप्ताहिक बंद असतो. त्यात 70 टक्के दुकाने बंद असतात. मंगळवारी बंद पाळण्यात आला. यात अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकानेही बंद झाल्याने बंद यशस्वी झाला. छोटे विक्रेते, भाजी विक्रेते यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला होता. दुकाने बंद असली तरी वर्दळ मात्र सुरू होती. बसेस दुपारपर्यंत बंद होत्या. रिक्षा वाहतूक, वडाप वाहतूक बंद होती. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची पाठ
विरोधी पक्षांच्या बंदला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पाठिंबा दिला होता. मात्र येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंदकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. बळीराजा, स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बंदचे आवाहन केले. यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दिसले नाहीत.
मलकापुरात बंदला प्रतिसाद शेतकरी कायद्या विरोधात भारत बंदला मलकापुरात 90 टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात मेडिकल सेवांसह इतर अपवाद वगळता सर्व दुकाने बंद होती. भाजीपाला विक्रीही बंद होती. त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट होता. मलकापूर शहरात मंगळवारी मुळातच दुकाने बंद असतात. मात्र तरीही शहरातील बरेच व्यवहार मंगळवारीही सुरू असतात. 8 डिसेंबर रोजी मात्र भारत बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. ढेबेवाडी फाटय़ावर पोलीस बंदोबस्त होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सकाळी मलकापूर, आगाशिवनगर भागात फिरून बंदोबस्तासह इतर आढावा घेतला. आगाशिवनगर भागातील अपवाद वगळता सर्वच दुकाने बंद होती. इतर वेळेस फुटपाथवर भाजी विक्रेत्या शेतकरी, व्यापारी यांची गर्दी असते मात्र मंगळवारी शेतकरी, व्यापारी फारसे दिसले नाहीत. दुपारी चार नंतर भाजी विक्रेत्यांची संख्या काहीशी वाढली होती. ढेबेवाडी फाटा परिसरातही शुकशुकाट होता. एक दोन चहाची दुकाने वगळत इतर व्यवहार बंद होते. मलकापूर फाटय़ावरही काही दुकाने सुरू तर काही बंद होती. पोलिसांनी बंदच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजांवरही लक्ष ठेवले