शहर वार्ताहर / राजापूर
केंद्र शासनाने कलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी व अन्य संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी संपात सहभाग न घेतल्याने बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत चालू होते. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठ सुरू होत्या.केंद्र शासनाने कृषी धोरणामध्ये बदल करण्यासाठी तीन नवीन कृषी कायदे केले आहेत. या कायद्याविरोधात गेले काही दिवस दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी मंगळवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. यामध्ये अनेक संघटनांनी सहभाग घेतला होता. यानुसार देशभरात ठिकठिकाणी बंद पाळला जात आहे. मात्र, जिल्ह्यात हा बंद अयशस्वी झाला. व्यापारी संघटनानी तर आधीच बंदमध्ये सहभागी होणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे जिल्ह्यात बाजारपेठ सुरळीत सुरू होती. मात्र संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची संख्या कमी होती. एसटी सेवा सुरळीत सुरु होती. कायदा व्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेतली होती. बाजारपेठात पोलीस तैनात करण्यात आले होते.









