प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची इच्छा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची होती. मात्र, याला हायकमांकडून संमती मिळाली नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे, अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली. बेंगळुरातील पक्षाच्या कार्यालयात ते पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री आर. अशोक पुढे म्हणाले, राज्यात भाजप सरकार सत्तेवर येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात समावेश करून घेण्याच्या तयारीत मुख्यमंत्री होते. तसेच रविवारी सायंकाळपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करणार होते. मात्र, हायकमांडकडून संमती न मिळाल्याने पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. संक्रांतीनंतरच विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बेळगावातील कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.









