पर्यटन व्यावसायिकांची भूमिका : बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या तोंडी आदेशावर नाराजी
प्रतिनिधी / मालवण:
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्टस् सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे जर ते बंद करायचे झाल्यास जिल्हाधिकारी यांचेच आदेशच आम्ही माणणार आहोत, अशी भूमिका मालवण तालुक्यातील वॉटरस्पोर्टस् व्यावसायिकांनी घेतली आहे. बंदर विभागाचे मुख्य बंदर अधिकारी तोंडी आदेश देऊन वॉटरस्पोर्टस् बंद करण्याचा प्रयत्न करीत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत जिल्हाधिकाऱयांचे आदेश रद्द होत नाहीत, तोपर्यंत आम्ही व्यवसाय सुरूच ठेवणार, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेत बंदर विभागाच्या कार्यवाहीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त बंदर कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला होता.
बंदर विभागाचे मुख्य बंदर अधिकाऱयांनी शुक्रवारपासून किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्टस् बंद करण्याचे आदेश बंदर निरीक्षकांना दिले होते. त्यानुसार तालुक्यातील सर्व वॉटरस्पार्टस् बंद करण्यात आले होते. ऐन पर्यटन हंगामात बंदर विभागाकडून कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात आल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या नाराजीचा रोष व्यावसायिकांनी शनिवारी दुपारी मालवण बंदर कार्यालयात व्यक्त केला. यावेळी देवबाग, तारकर्ली, वायरी, मालवण येथील पर्यटन व्यावसायिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, सहाय्यक बंदर निरीक्षक ए. एल. गोसावी यांच्याशी पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू, बाबली चोपडेकर, मनोज खोबरेकर, दिलीप घारे, राजन कुमठेकर, सतीश आचरेकर, बाबली चोपडेकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, अरविंद मोंडकर, माजी नगरसेवक महेश जावकर, रुपेश प्रभू, मनोज मेथर, महेश कोयंडे, रमेश कद्रेकर, रश्मीन रोगे, नूतन रोगे, वैभव खोबरेकर, आबा तारी, रॉड्रिक्स तसेच अन्य व्यावसायिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पत्र देऊन किल्ला होडी सेवा वाहतूक सुरू
जिल्हाधिकाऱयांचा आदेश असल्याने आम्ही किल्ला होडी सेवा सुरू ठेवणार आहोत, असे पत्र किल्ला होडी सेवा वाहतूक संघटनेने बंदर विभागाला देत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत किल्ला होडी सेवा वाहतूक सुरू ठेवली होती.
आमच्यावरच अन्याय का?
कोरोना काळात सर्वात जास्त काळ पर्यटन व्यवसाय बंद राहिला आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक आर्थिकदृष्टय़ा पूर्णपणे अडचणीत आले आहेत. असे असताना आता कुठे पर्यटन व्यवसाय पुन्हा उभा राहत असताना बंदर विभागाच्या अधिकाऱयांकडून त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे. यापूर्वीही अशाप्रकारे वॉटरस्पोर्टस् बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता पुन्हा त्याच अधिकाऱयांनी आदेश दिले आहेत. कोणतेही लेखी आदेश दिलेले नाहीत. मग आमच्याकडे जिल्हाधिकाऱयांचे लेखी आदेश पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे असताना आमच्यावरच पुनःपुन्हा अन्याय का? असा सवाल व्यावसायिकांनी यावेळी बंदर विभागाच्या अधिकाऱयांकडे उपस्थित केला.
जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी राहील!
जिल्हाधिकारी सागरी जलक्रीडा पर्यटन सुरू करण्याचे आदेश देतात आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या मुख्य कार्यालयातून जलक्रीडा बंद करण्याचे आदेश होतात. पण आम्हाला हा प्रशासकीय गोंधळ मान्य नाही. तो बंदर विभागाने निस्तरावा. तूर्तास आम्ही जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने पर्यटन सुरू ठेवणार. आम्ही कारवाईस सामोरे जाण्यास तयार आहोत. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
लेखी आदेश नसताना कारवाई का?
मुख्य बंदर अधिकारी यांनी किनारपट्टीवरील भागात जलक्रीडा प्रकार सुरू असतील, तर स्थानिक पातळीवरील बंदर निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत. मात्र सदरचे कोणतेही आदेश लेखी स्वरुपात नसल्याने आम्हाला हे आदेश मान्य नाहीत, अशी भूमिका पर्यटन व्यावसायिकांनी घेतली. जर तरीही बंदर निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यास आम्ही व्यावसायिक त्यांच्या पाठिशी उभे राहू, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.









