प्रतिनिधी / कराड
पूर्व वैमनस्यातून एकावर चाकूने वार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी कालेटेक येथे घडली. या मारहाणीत इंद्रजित शंकर पवार व अजय दिलीप देशमुख हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद अजय देशमुख (वय 25, रा. सिद्धनाथ कॉलनी, कोयनावसाहत, ता. कराड) यांनी ग्रामीण पोलिसात दिली असून याप्रकरणी सातजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारच्या सुमारास अजय व इंद्रजित हे दुचाकीवरून घोगाव बाजूला निघाले होते. त्यावेळी दोन चारचाकी गाडीतून सातजणांच्या टोळक्याने कालेटेक येथे त्यांच्या दुचाकीसमोर चारचाकी गाडी आडवी मारून इंद्रजित व अजयला दमदाटी, शिवीगाळ करत लाकडी दांडके, दगड, बेल्टने मारहाण केली. यावेळी एकाने अजयच्या पाठीवर चाकूने वार केला. जखमीवर खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत रात्री उशिरा अजय देशमुख याने तालुका पोलिसात फिर्याद दिली असून सातजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.