प्रतिनिधी / राजापूर
राजापूर तालुक्यातील कोकण ग्रामीणसाठी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी सुमारे 18 कोटी रूपये निधीची आवश्यकता असून यामुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
कोकण ग्रामीण पर्यटनद्वारे कोकणातील विकासाला चालना मिळणार असल्याने तत्कालीन सरकारने आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीने सन 2018/19 चे आराखडे तयार करून पर्यटन विकास खात्याकडे पाठवून दिले. मात्र या संदर्भात पुढील कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. या आराखड्यानुसार विकास झाल्यास राजापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात. पर्यायी येथील तरूणांच्या हाताला काम मिळेल. आर्थिक समस्या दूर होईल. त्याच प्रमाणे पत्येक गावाला चांगला महसूलही मिळू शकतो. यामुळे तेथील ग्रामपंचायत अक्षिक सक्षम होईल हा दृष्टीकोन ठेऊन विकास करण्याचे धोरण शासनाने समोर ठेवले होते.
राजापूर तालुक्यामध्ये गोवळ येथील समुद्रबीच परीसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा पुरविण्यासाठी 90 लाख, जूवे जैतापूर येथील समुद्रबीच परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा पुरवणेसाठी 90 लाख, देवाचेगोठणे येथील समुद्रबीच परिसर सुधारणे, कातळशिल्पे विकसित करणे व मुलभूत गरजा सुविधा पुरवण्यासाठी 90 लाख, राजवाडी तिवरे येथील समुद्रबीच परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा 1 कोटी 35 लाख, उन्हाळे येथील गरम पाण्याचा झरा परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधासाठी 85 लाख, कशेळी येथील समुद्रबीच परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा पुरवण्यासाठी 90 लाख, जुवाठी येथील तळी धबधबा, देवकोंड परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा पुरवण्यासाठी 99 लाख, आंबोळगड येथील समुद्रबीच परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा 93 लाख, माडबन येथील समुद्रबीच परिसर सुधारणे व मुलभूत गरजांसाठी 1 कोटी.
देविहसोळ येथील आर्यादुर्गा मंदिर परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधांसाठी 80 लाख, तेरवण येथील विमलेश्वर मंदिर परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधांसाठी 61 लाख, अणसुरे दांडे येथील समुद्रबीच परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा 90 लाख, पांगरे बुद्रुक येथील पांडवकालिन परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा 90 लाख, मूर येथील काळेश्वर मंदिर परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा 1 कोटी 77 लाख, दोनिवडे येथील ब्रम्हदेव मंदिर परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा 92 लाख, व नाटे मुसाकाझी येथील समुद्रबीच परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधांसाठी 80 लाख, चुनाकोळवण येथील सवतकडा परिसर सुधारणे व मुलभूत गरजा सुविधा 95 लाख आदींचा समावेश आहे.
राजापूर तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवून आमदार डॉ. राजन साळवी यांनी वेळोवेळी शासन दरबारी निवेदन देऊन अनेकवेळा पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने आमदार साळवी यांनी पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यावरण मंत्री ठाकरे यांची भेट घेऊन मतदार संघातील ऐतिहासिक वास्तू, लाभलेला समुद्र किनारा, पर्यटन विकासामुळे मिळणार रोजगार आदी विषयांवर चर्चा केली. या चर्चेला पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल.