एसईबीसी प्रवर्गातील 1228 विद्यार्थ्यांचे प्रवेश खुल्या प्रवर्गात
3ते 8 डिसेंबरपर्यंत पहिल्या यादीतील प्रवेश
9 डिसेंबरला दुसरी यादी जाहीर होणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या संक्रमणामुळे जुलै महिन्यात पूर्ण होणारी अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे एसईबीसीमधील 1228 विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात ऍटो कन्वर्ट करून बुधवारी 35 महाविद्यालयातील अकरावीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. परिणामी विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा गतवर्षीपेक्षा यंदा 2.50 ते 3 टक्केनी कटऑफ पाँईंट वाढला आहे. 3 ते 8 डिसेंबरपर्यंत पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. तर 9 डिसेंबरला दुसरी प्रवेश फेरी जाहीर होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत, त्यामुळे कोणीही गोंधळून जावू नये, असे आवाहन सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एसईबीसी संवर्गामधील 1228 विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात ऍटो कन्वर्ड केले आहेत. खुल्या वर्गाला 26 टक्केऐवजी आता 38 टक्के जागा देण्यात आल्या आहेत. परिणामी खुल्या संवर्गात स्पर्धा वाढल्याने याचा परिणाम महाविद्यालयांच्या कटऑफ पॉईंटवर झाला आहे. विवेकानंद, न्यू कॉलेज, राजाराम, कॉमर्स कॉलेजसह शहरातील सर्वच कॉलेजमधील कटऑफ पॉईंटमध्ये 2.50 ते 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. गुणवत्तेनुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या सूचना फलकासह संकेतस्थळावरही पहिली यादी प्रसिध्द करण्यात यावी, अशा सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांनी 8 डिसेंबरपर्यंत संबंधीत महाविद्यालयावर प्रवेश घ्यावयाचा आहे. पहिल्या यादीतील प्रवेश निश्चितीनंतर 9 डिसेंबरला दुसरी प्रवेश फेरी जाहीर केली जाणार आहे. यावेळी प्राचार्य एस. एस. चव्हाण, प्रशांत नागावकर, उपप्राचार्य टी. के. सरगर, आर. व्ही. पोर्लेकर, राजेंद्र कोळेकर, एस. एम. नवले, बी. जी. खाडे, आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तक्रार करावी
विद्यार्थ्यांना आपल्या गुणानुसार महाविद्यालय मिळाले नसेल तर त्यांनी संकेतस्थळावर शुक्रवार 4 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन आलेल्या तक्रारींचा विद्यार्थ्यांची टक्केवारी, संवर्ग आणि आलेली तक्रार पाहून तक्रारीचे निरसण केले जाईल. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निरसण करण्यासाठी तज्ञांची कमिटी नेमली आहे. ऑफलाईन तक्रार स्विकारली जाणार नाही, याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी.
काही महाविद्यालयांच्या जागा वाढवल्या
वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी 1600 क्षमता असून 1816 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर वाणिज्य मराठी माध्यमासाठी 3360 क्षमता असून 2317 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विज्ञान शाखेसाठी 6 हजार क्षमता असून 6822 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. वाणिज्य इंग्रजीला 216 तर विज्ञान शाखेला 822 अर्ज जास्त आल्याने शहरातील कॉमर्स कॉलेजला इंग्रजी माध्यमाला 18 जागा तर सर्वच कॉलेजमधील विज्ञान शाखेला 10 जागा वाढून देण्यात आल्या आहेत.
या महाविद्यालयांचा कटऑफ पॉईंट
विज्ञान विभागात न्यू कॉलेज आणि प्रायव्हेट हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजचा यंदाचा कटऑफ पॉईंट 93 टक्के आहे. तर विवेकानंद आणि राजाराम कॉलेजचा कटऑफ पॉईंट 92.60 आहे. तसेच एस. ए. लोहिया ज्युनिअर कॉलेज, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल ऍनड ज्युनिअर कॉलेज आणि श्री हणमंतराव चाटे ज्युनिअर कॉलेजचा कटऑफ पाँईंट 92.20 टक्के आहे. तर वाणिज्य इंग्रजी विभागात डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजचा कटऑफ पॉईंट 93.40 टक्के आहे. तर वाणिज्य मराठी विभागात एम. एल. जी. हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजचा कटऑफ पॉईंट 60.40 टक्के आहे. एकूणच सर्वच महाविद्यालयाचा कटऑफ पॉईंट 2.50 ते 3 टक्केंनी वाढला आहे.
एसएमएसव्दारे विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीनुसार कोणत्या महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना मोबाईलवर एसएमएसव्दारे देण्यात आली आहे. महाविद्यालयांना मेलव्दारे विद्यार्थ्यांची लिस्ट देण्यात आली आहे. या लिस्टची प्रिंट काढून महाविद्यालयात दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.