चार दशकांपूर्वी एका जगावेगळय़ा संशोधनाची कल्पना जन्माला आली. ती साकारत गेली नि काही वर्षांपूर्वी त्या संशोधनाचा अपमृत्यू झाला. केव्हातरी ही हकिकत सर्वांना सांगायची होती. आज सांगायला घेतो.
सत्तरच्या दशकात एका भोळसट आणि उत्साही तरुणाला विमा कंपनीत नोकरी लागली. सुरुवातीला त्याला काही सोपी कामे देण्यात आली. मग जसजसा तो विम्याच्या संकल्पनेशी परिचित होत गेला तसतशी त्याला अवघड कामे दिली जाऊ लागली. कालांतराने त्याला कंपनीतलं जोखमीचं काम देण्यात आलं. ते म्हणजे विमेदार मरण पावल्यावर त्याच्या वारसांना क्लेमची रक्कम देण्याचं काम. त्या काळात नोकऱया करणाऱया स्त्रियांपेक्षा नोकऱया करणारे पुरुष थोडे जास्त होते. त्यामुळे पुरुष विमेदार जास्त असत. विमेदार मरण पावला की त्याची आई, पत्नी किंवा अन्य वारस क्लेमची रक्कम मागायला येत.
आपला कथानायक वारसाकडून विमा पॉलिसी, विमेदाराच्या मृत्यूचा दाखला वगैरे कागदपत्रे मागवून घेई. त्यांचा अभ्यास करून आणि हिशेब करून क्लेमची रक्कम चेकने रवाना करीत असे. या कामात तो इतका वाकबगार झाला की काही वर्षांनी त्याला बढती मिळाली ती त्याच विभागात म्हणजे क्लेम्स देणाऱया विभागात.
बघता बघता वर्षे लोटली. मधल्या काळात त्याच्या मनात एक विक्षिप्त कल्पना आली. विमेदाराचा मृत्यू झाल्यावर क्लेम देण्यापूर्वी त्याची फाईल काढण्यात येते. फाईलमध्ये विमेदाराची जन्मतारीख व इतर तपशील असत. नायकाच्या मनात विचार आला की विमेदाराची जन्मतारीख-स्थळ-वेळ आणि मृत्यूची तारीख-स्थळ-वेळ ठाऊक झाल्यावर एक प्रयोग करावा. क्लेमचा चेक देण्यापूर्वी वारसांना विनंती करून विमेदाराची कुंडली मागून घ्यावी.
त्याने एक खाजगी फाईल तयार केली. मृत विमेदाराची जन्मतारीख-स्थळ-वेळ, कुंडलीची प्रत आणि मृत्यूची तारीख-स्थळ-वेळ-कारण वगैरेचे तपशील नोंदवायला सुरुवात केली. त्याच्या नोकरीला आता पंधरा वर्षे झाली होती. अद्याप पंचवीस वर्षे बाकी होती. येणाऱया काळात आपण किमान दहा हजार विमेदारांच्या वारसांना क्लेम देऊ. म्हणजे दहा हजार कुंडल्या आणि मृत्यूच्या तारखा आपल्याकडे असतील. निवृत्त झाल्यावर आपण त्यांचा अभ्यास करून दोन निष्कर्ष काढायचा प्रयत्न करू शकू. ज्योतिषशास्त्र खरे आहे का? कुंडलीवरून कोणाच्याही मृत्यूची अदमासे तारीख ठरवता येईल का?
पुढे काय झाले ते उद्या सांगतो.








