रती हुलजी हिची मिस इंडियासाठी निवड
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. बेळगावची कन्या रती हुलजी ‘फेमिना मिस कर्नाटक’ ठरली असून तिची ‘मिस इंडिया’साठी निवड झाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम फेरीत तिने मिस कर्नाटकचा किताब मिळविला. फेब्रुवारी 2021 मध्ये मिस इंडिया स्पर्धा होणार आहे.
मूळची बेळगाव सध्या मुंबई येथे असणाऱया रती हुलजी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक ऍड फिल्ममधून तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाय रोवले आहेत. बॅचलर ऑफ मासमीडियाचे शिक्षण घेतल्यापासून ती मॉडेलिंगमध्ये काम करीत आहे. यापूर्वी अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.
मिस कर्नाटकसाठीच्या अंतिम 5 स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली होती. 30 नोव्हेंबर रोजी याची अंमित फेरी होती. यामध्ये तिने यश मिळवित मिस इंडियासाठीचे आपले स्थान बळकट केले. पुढील महिन्यात प्रशिक्षण कालावधी असून 31 पैकी 15 स्पर्धकांची मिस इंडियासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अंतिम फेरी होणार आहे.
रती हुलजी ही गणेशपूर येथील शरद काचोजी हुलजी व टिळकवाडी येथील सीमा उमेश भटकळ यांची कन्या आहे. बेळगावच्या कन्येने मिस कर्नाटक स्पर्धा जिंकल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.









