महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या एका ८० फूट खोल विहिरीत एक मोकाट कुत्रे पडले होते. हे कुत्रे महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान व प्राणिमित्रांनी बाहेर काढत त्याला जीवदान दिले.
शहराच्या बाजारपेठेच्यामध्यवर्ती भागात एक ब्रिटिशकालीन अरूंद विहीर आहे. ही विहीर ८० फूट खोल आहे. या विहिरीत शुक्रवारी सायंकाळी मोकाट कुत्रे पडले. कुत्रे भुंकत असल्याने परिसरात राहणाऱ्या भिसे कुटुंबीयांनी याची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना दिली. या जवानांनी वेगवेगळ्या मार्गाने कुत्र्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. अखेर दोरखंडाच्या साहाय्याने टीमचे सदस्य सनी बावळेकर हे या विहिरीत उतरले अन् त्या जखमी कुत्र्याला बाहेर काढले. यानंतर या कुत्र्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. ही मोहीम तब्बल तीन तास सुरू होती.