महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
अनिरुद्धाने बाणासुराबरोबर आलेल्या अनेक राक्षस वीरांना आणि सैनिकांना कंठस्नान घातले. याला युद्धात सहज पराजीत करणे शक्य नाही, हे बाणासुराच्या लक्षात आले. मग त्याने आसुरी मायेला आवाहन करून अनिरुद्धाला नागपाशाने बांधून टाकले. नागपाशाने मोहीत होताच अनिरुद्ध काष्ठवत् बेशुद्ध होऊन पडला. मग त्याचे हातपाय दोरखंडांनी बांधण्यात आले. आता अनिरुद्धाला ठार मारावे असा विचार बाणासुराच्या मनात आला. त्याचवेळी त्याचा सल्लागार मंत्री कुंभाण्ड त्याला म्हणाला – हा अत्यंत वीर, मोठा पराक्रमी युवक दिसतो. तो अत्यंत रुपसंपन्नदेखील आहे. हा कुणी सामान्य कुळातील दिसत नाही. याला ठार मारू नये. याच्या कुळ गोत्राचा तपास करुया आणि मगच याचे काय करायचे ते ठरवू. आपली कन्या व याचे शारीरिक संबंध आले आहेत. हा तिला अत्यंत प्रिय आहे. असे असता आपण याचा जीव घेतल्यास उषा देखील आपल्या जीवाचे काही बरे वाईट करून घेईल, याचाही विचार करावा. बाणासुराला कुंभाण्डाचा हा सल्ला पटला. त्याने विवेकाने विचार करून बांधलेल्या अनिरुद्धाला सैनिकांच्या बंदोबस्तात ठेवून तो आपल्या महालात परतला.
तंव उषा हृत्कमळीं घाबरी । करितां कान्ताची अवसरी । वार्ता घेऊनियां किंकरी । आल्या सहचरी ते काळीं ।
म्हणती अवो बाणात्मजे । तुझ्या कान्तें प्रतापें तेजें ।
प्रचंड दैत्य मारिले पैजे । कोणी न झुंजे येणेंसी ।
धुरा पाडिल्या समराङ्गणीं । केली गजदळा भंगाणी ।
रथी झोडिले परिघेंकरूनी । गेले पळोनि महावीर।
हा एकला ते बहुत । मारिती नि निष्ठर शस्त्रघात ।
अनिरुद्धवीर प्रतापवंत । प्रलयकृतान्त तुलनेचा।
प्रचंड मारिली दैत्यसेना । परम संकट पडिलें बाणा ।
तेणें वारूनि कृतसाधना । आणिला रणा अनिरुद्ध।
बाणें नागपाशें बांधूनी । अनिरुद्ध पाडिला समराङ्गणीं ।
भोंवतीं रक्षणें ठेवूनी । आपण सदनीं प्रवेशला ।
ऐसी अनिरुद्धाची वार्ता । किंकरीवदनें उषा ऐकतां ।
शोकविषादें विह्वळचित्ता । मूर्छित पदली धरणिये ।
किंकरी धांवूनि सांवरिती । म्हणती सखिये न करिं खंती ।
चिरंजीव तुझा पति । स्मरें वरदोक्ति गौरीची ।
नागपाशीं बांधिला असे । तेणें जाकळे परमक्लेशें ।
एऱहवीं प्राणांचें भय नसे । दृढविश्वासें जाण पां ।
ऐकूनि उषा करी रुदन । म्हणे नागपाशांचें बंधन ।
न सोसतां त्यजील प्राण । परम निर्वाण ओढवलें ।
शोकें जाकळे कलेवर । विषादें जाकळे अंतर ।
म्हणे जनकें साधिलें वैर । व्याघ्रमार्जारपडिपाडें ।
म्हणे माझीच बुद्धि कुडी । कान्त आणिला येथ अवघडीं । सप्रेमसुखाचिये आवडी । मरणा वरपडी पैं केला । आतां कोणा जाऊं शरण । कैसे वांचती वराचे प्राण । कां पां न पवे गौरीरमण । बद्धमोक्षण करावया । जाऊनि प्रार्थू जरी पितयासी । तरी तो केवळ अविवेकराशि ।
सांगों जातां मातेपासीं । संकट तयेसी न निवारे ।
Ad. देवदत्त परुळेकर








