संजय राऊत यांनी केले अनेक गौप्यस्फोट : सरकार स्थापनेचा उलगडला प्रवास
प्रतिनिधी/ मुंबई
प्रियम गांधी यांच्या ‘टेडिंग पॉवर’ला रविवारी खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ उत्तर दिले. शरद पवार यांच्याबरोबर सुरू असलेल्या 35 दिवसांच्या गाठीभेटींचा घटनाक्रम उलगडत संपूर्ण गौप्यस्फोट केला. तो टाईमपास नव्हता तर सरकार स्थापनेसाठी आणि ते टिकवण्यासाठी आखला जात असलेला चक्रव्यूह होता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने सामनातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला लक्ष्य करत सरकार स्थापनेचा प्रवास मांडला आहे.
काय आहे ‘रोखठोक’मध्ये ?
या सदरामध्ये राऊत यांनी नमूद केले की, 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी, सत्तानाटय़ निव्वळ टाईमपास, असल्याचा अपप्रचार सुरू होता. तथापि पत्रकारांनी केलेल्या या प्रचाराला मी 170 आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगितल्यावर आमची खिल्ली उडवण्यात आली. सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. खरगे, पफथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळते, यावरच होते. तर खरगे यांनी विधानसभा अध्यक्षपदावरुन घेतलेल्या विरोधी भूमिकेने वाद निर्माण झाला. त्यांची शरद पवारांबरोबर शाब्दिक चकमक झाली. पवार संतापून निघालेच होते. तथापि मी व प्रफुल्ल पटेल धावत गेलो आणि त्यांना रोखले. तरीही चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता, असा महत्त्वाचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
या कालावधीत दिल्लीत असतानाही शरद पवारांबरोबर माझा सतत संवाद सुरू होता. भाजपशी डील करण्याची पवारांची मनःस्थिती दिसली नाही. त्यांनी भाजपबरोबर संपर्क करून सरकारही स्थापन करणार नसल्याचे थेट मोदी यांना सांगणार असल्याचे आपल्याला सांगितले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पवार आणि एका उद्योगपतीबरोबर बैठक घेत होते. मात्र या सगळय़ा बाबी टळल्या आणि आपण सांगितलेले सर्व खरे ठरले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व अन्य सर्व बाबींची तडजोड होत महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याचे स्पष्ट करत ‘ट्रेडिंग पॉवर’ची पॉवर काढून घेतली.







