अनैतिकतेस उत, गोवा सुरक्षा महिला मंचचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
कळंगूट, पर्वरी परिसरात यापूर्वी वेश्याव्यवसायाची प्रकरणे उघडकीस आली होती. आता ते लोण आता थेट राजधानी पणजी शहरातच पोहोचले असून एका न्यूज पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओवरून ते स्पष्ट झाले आहे. या प्रकारास पूर्णपणे राजधानीतील कॅसिनो जबाबदार असून त्यांच्या माध्यमातूनच जुगार, ड्रग्ज, वेश्याव्यवसाय यासारख्या अन्य अनैतिक गोष्टींना उत आला आहे. सरकारने हे प्रकार त्वरित थांबवावे, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचच्या महिला मंच अध्यक्ष रोशन सामंत यांनी केली आहे. अन्यथा त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी विद्या डिचोलकर, अतुला बेळेकर व प्रगती केरकर यांचीही उपस्थिती होती. गोवा ही देवभूमी, पुण्यभूमी, सात्विक भूमी ओळख आहे. परंतु सध्या भरदिवसा राजधानी शहरात भरलोकवस्तीत घडणारे प्रकार पाहता ती ओळखच नष्ट होण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या.
गोव्यात राजरोसपणे ड्रग्ज, जुगार, वेश्याव्यवसाय यासारखे प्रकार घडतात हे जगजाहीर आहे. अनेक वेबसाईटस् त्या प्रकारांना खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. त्यामुळे स्थानिक महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पणजीत अनेक सरकारी कार्यालये, खाजगी आस्थापने आहेत. तेथे शेकडो महिला कामासाठी येत असतात. अशावेळी एखाद्या बसस्थानकावर थांबलेल्या महिलेस ’ती त्यातलीच’ समजून एखाद्या पर्यटकाने हटकली तर तिची काय अवस्था होईल? असे प्रकार घडतच राहिल्यास सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होईल. त्यामुळे सरकारने याचा गांभिर्याने विचार करावा व गोव्याची होणारी कुप्रसिद्धी, अपकीर्ती थांबविण्यासाठी पोलीस खात्यास सक्रीय करावे, अशी मागणी सौ. सामंत यांनी केली.
1 नोव्हेंबरपासून पॅसिनो पुन्हा सुरू झाले आणि पणजीचे चित्र पुन्हा बदलले. रस्त्यावर फिरणाऱया भडक दिसणाऱया मुली, पॅसिनोत प्रवेशासाठी उडालेली झुंबड, पॅसिनोमुळे शहरात सुरू झालेले अनैतिक धंदे, इंटरनेटवरून चाललेली गोव्याची बदनामी, यासारख्या प्रकारांकडे पोलिसांच्या सायबर सेलचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळेच अनैतिक व्यवसायांचे जाळे अधिकाधिक पसरत आहे. त्यावर त्वरित नियंत्रण आणावे, अन्यथा भविष्यात त्यावर नियंत्रण आणणे कठीण होईल, असे सौ. सामंत म्हणाल्या.









