दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती
पुणे / प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरातील वादळांची मालिका सुरुच असून, ‘निवार’नंतर आता 2 डिसेंबरपर्यंत आणखी एक नवीन वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात 29 नोव्हेंबरच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला.
बंगालच्या उपसागरात यंदा अनेक वादळे आली. बुधवारी रात्रीच ‘निवार’ हे चक्रीवादळ तामिळनाडू ते पाँडेचरीच्या दरम्यान धडकले. जमिनीवर आल्यानंतर या चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. यामुळे तामिळनाडू, पाँडेचरी, आंध्र किनारपट्टी तसेच तेलंगणाच्या भागात अतिवृष्टी झाली आहे. या वादळाचा प्रभाव ओसरत नाही तोच, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात 29 नोव्हेंबरच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, त्याची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. हे क्षेत्र पश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत, 2 डिसेंबरला तामिळनाडू-पाँडेचरी किनारपट्टीला धडकेल. याच्या प्रभावामुळे 1 डिसेंबरपासूनच जोरदार पाऊस होणार असून,2-3 डिसेंबरला अतिवृष्टीचा इशारा आहे. यामुळे शनिवारपासूनच दक्षिणपूर्व बंगाल, दक्षिण अंदमान समुद्र तसेच तामिळनाडू, पाँडेचरी किनारपट्टीवर समुद्राची स्थिती खवळलेली राहणार असून, वेगाने वारे वाहणार आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आहे.








