१ लाख २७ हजाराचे दागिणे लंपास
प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील थोरात चौकातील मुक्त सैनिक सोसायटीमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून त्यातील सुमारे पावणे तीन तोळ्याचे व चांदीचे दागिने असा १ लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरीची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून, याची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मुक्त सैनिक सोसायटी मधील आदर्श विद्या मंदिरानजीक मीना रविंद्र माने ही महिला आपल्या कुटुंबासह राहत आहे. गुरुवारी रात्री त्यांच्या कुटूंबियांनी एकत्रित भोजन करून, राहत्या घराला कुलूप लावून त्या घराच्या पहिल्या मजल्यावर झोपण्यास गेल्या. याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याच्या कानातील रिंगा, अर्धा तोळ्याची अंगठी, दोन ग्रॅम वजनाची नाकातील नथ यासह चांदीचे दागिने असा १ लाख २७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. शुक्रवारी सकाळी मीना माने मजल्यावरून खाली आल्या असता त्यांना घरातील कुलूप तुटलेले दिसले. याची माहिती त्यांनी घरात सांगितली. त्यानंतर आत जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाट फोडून दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले.