विवाहासाठी बाजारपेठेत पूजेचे साहित्य दाखल : सोहळा साधेपणाने होणार
प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवारी तुळशी विवाह होणार असून यंदा हा सोहळा साधेपणानेच करावा लागणार आहे. अर्थात सार्वजनिक स्वरुपात होणाऱया तुळशी विवाहाला मर्यादा असल्या तरी घरोघरी मात्र तुळशी विवाह होणार आहे. या विवाहासाठी बाजारपेठेत तुळशी वृंदावन, आवळा, चिंचा, फुले आदी पूजेचे साहित्य तसेच सौभाग्यवाण दाखल झाले आहे.
सौभाग्यवाणामध्ये हिरव्या बांगडय़ा, मणी-मंगळसूत्र, जोडवी, हळदी-कुंकू, फणी असे साहित्य आहे. गुरुवारी विवाह असल्याने बुधवारी घरातील तुळशी वृंदावनाला रंगरंगोटी करून त्यावर श्री राधा-कार्तिक दामोदर प्रसन्न अशी अक्षरे रेखाटण्यात आली. काही घरांमध्ये तुळशी ही नियोजित वधू मानून तिच्यासाठी ताजे पापड, शेवया करण्यात आल्या. या सर्व पदार्थांसह तिला नैवेद्य दाखविण्यात येईल. तुळशी विवाहाला आवळय़ाची आणि चिंचेची फांदी तुळशीसोबत ठेवली जाते. त्याचीही पूजा करण्यात येईल. त्यानंतरच वास्तविक आवळे, चिंचा खाण्यास सुरुवात करावी, असा प्रघात आहे. सोयीनुसार गुरुवारी तुळशीचा श्रीकृष्णाबरोबर विवाह लावला जाईल. या विवाहाच्या निमित्ताने बाजारपेठेत तुळशी वृंदावनही दाखल झाले आहे. काँग्रेस रोडवर रोप विक्री करणाऱया विपेत्यांनी अशी वृंदावने विक्रीस आणली असून आचार्य गल्ली, गाडेमार्ग या ठिकाणी सुद्धा तुळशी वृंदावनांची विक्री सुरू आहे.









