निर्बंध घालण्याचे अधिकार राज्यांना : सर्वेक्षण, नियंत्रणावर भर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात पुन्हा वाढीला लागलेल्या कोरोना संसर्गाचे सर्वेक्षण, नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर भर देणाऱया नव्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. त्यांचे क्रियान्वयन 1 डिसेंबर 2020 पासून करण्यात येणार आहे. या तत्त्वांनुसार बाधित क्षेत्रातील लॉकडाऊनसारख्या उपाययोजना किंवा निर्बंध घालण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले
आहेत.
कोरोनाबाधित क्षेत्राचे (कंटेन्मेंट झोन) निर्धारण काटेकोरपणे करावे, यासाठी जिल्हा प्राधिकरणांचे साहाय्य घ्यावे, तसेच सूक्ष्म पातळीवर उपाययोजना करताना केंद्र सरकारच्या विविध विभागांनी घोषित केलेल्या सूचना लक्षात घ्याव्यात. कोरोनाबाधित क्षेत्रात लॉकडाऊन किंवा रात्रीची संचारबंदी घोषित करण्याचा अधिकार राज्यांना असला तरी बाधितक्षेत्राच्या बाहेर लॉकडाऊन घोषित करायचा असल्यास केंद्र सरकारची अनुमती आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी…
सार्वजनिक कार्यक्रमांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार बंदिस्त स्थानांवर होणाऱया धार्मिक, सामाजिक, क्रीडासंबंधी, मनोरंजनात्मक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱयांची संख्या 100 पेक्षा जास्त असू नये, अशी सूचना केली आली.
केंद्र सरकारने केलेल्या नव्या सूचनांचे कसोशीने पालन करण्यात यावे, असे आवाहन राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना केले आहे. हिवाळय़ात अधिक प्रमाणात लक्ष ठेवून आणि सर्वेक्षणे करून रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवावी, तसेच अत्यवस्थ रुग्णांसाठी सोयी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात यावे. मृत्यूदर कमी करण्यावर भर द्यावा, असेही सांगण्यात आले.
परिस्थिती सामान्यतः नियंत्रणात
मंगळवार संध्याकाळ ते बुधवार संध्याकाळ या 24 तासांमध्ये देशभरात 44 हजार 746 नवे रुग्ण आढळून आले. तसेच 481 जणांवर मृत्यू ओढवला. 37 हजार 816 रुग्ण बरे झाले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या आता काहीशी वाढून 4 लाख 44 हजार 746 इतकी झाली आहे. एकंदर रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱयांचे प्रमाण 93.72 टक्के झाले आहे.
दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि तेलंगणा या आठ राज्यांमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत. इतर राज्यांमध्ये स्थिती सामान्य आहे. देशात आतापर्यंत 13 कोटी 48 लाख 41 हजार 307 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.