नवी दिल्ली : स्वयंचलित ड्रोन विमानांची निर्मिती भारतातच करण्यात तंत्रज्ञांनी उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. कृषी आणि आरोग्य सेवांना साहाय्यभूत ठरतील अशा ड्रोन्सची निर्मिती करण्यात आली असून त्यांचे क्रियान्वयन लवकरच होणार आहे. तसेच या ड्रोन्सचा उपयोग आपत्तीनिवारण कार्यातही केला जाणार आहे.
ही विमाने मानवरहीत असल्याने ती कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही दुर्गम स्थानी जाऊन सेवासामग्री पुरवू शकतात. त्यामुळे त्यांचा उपयोग निर्धोकपणे केला जाऊ शकतो. म्हणून अशा विमानांच्या निर्मितीवर भर देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. खासगी कंपन्यांनाही अनुमती दिली गेली आहे. अलिकडे ड्रोन्सचा उपयोग युद्धात किंवा सीमा संरक्षणासाठी केला जातो. याशिवाय शत्रूच्या प्रदेशात शस्त्रे डागणे, शत्रूची विमाने पाडणे, नौका बुडविणे इत्यादींसाठीही त्यांचा उपयोग होत आहे.
कशाप्रकारे उपयोग होणार ?
कृषीक्षेत्रात कीटनाशक फवारणी, पिकांचे सर्वेक्षण, विविध प्रकारच्या धोक्यांपासून पिकांचे संरक्षण, पिकांना लागलेल्या किडीचे प्रमाण निश्चित करणे इत्यादी कामांसाठी ड्रोन्सचा उपयोग केला जाणार आहे. तसेच पिक कापणी इत्यादींसारख्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठीही ड्रोन्स उपयोगी पडणार आहेत. तर आरोग्य सेवा क्षेत्रात औषधे दुर्गम स्थानी वेगाने पोहचविणे, रुग्णांना एका जागेवरून दुसऱया जागी हलविणे इत्यादी कामांसाठी ड्रोन्सचा उपयोग केला जाणार आहे.