प्रतिनिधी / सातारा
वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र त्वचारोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने दिला जाणारा लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार येथील ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मोहन पाटील यांना नुकताच जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना हा पुरस्कार दिला जातो, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
मुंबई येथे 29 डिसेंबरला संघटनेच्या ऑनलाइन होणाऱ्या परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. डॉ. पाटील हे साताऱ्यात गेली 40 वर्षे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच ते अनेक सामाजिक कार्यात, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात नेहमी आघाडीवर असतात. त्यांनी कुष्ठरोगासारख्या असाध्य रोगाबाबत जागृती निर्माण व्हावी, या क्षेत्रात काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या कामात सफाईदारपणा यावा, यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित केली. सातारा, कराड, सांगली परिसरात त्वचारोग तज्ज्ञांची संघटना उभी करून एक व्यासपीठ निर्माण केले आहे. यामुळे त्वचारोग रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळण्यात सुलभता आली आहे.
त्यांच्या रुग्णालयात आजही दिव्यांग, मतिमंद, एड्स झालेल्या विधवा, रयत शिक्षण संस्थेतील कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थी यांच्यावर ते मोफत उपचार करत असतात. धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंग, लक्ष्मीबाई पाटील मुलींच्या वसतिगृहातील मुलींना ते सातत्याने मदत करतात. गोरगरिबांसाठी झिजण्याचा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायात जपला आहे. या योगदानाबद्दल महाराष्ट्र त्वचारोग संघटनेने त्यांना हा पुरस्कार बहाल केला आहे.