प्रतिनिधी / लांजा
लांजा शहरातील एका कुटुंबाचे जुने घर मोडकळीस आले असून घर कधीही कोसळून पडून अनुचित प्रकार घडण्याच्या स्थितीत आहे. रस्ताच नसल्याने घर दुरुस्तीचे साहित्य घरापर्यंत घेऊन जाणे कठीण झाले आहे. घर दुरुस्त करण्यास घेत असून लांजा नगरपंचायत कुटुंबाच्या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. आपल्यावर नाहक अन्याय करत असल्याचे लांजा शहरातील बाकाळकर कुटुंबाने म्हटले आहे.
लांजा शहरातील मुजावरवाडी येथील जितेंद्र भिकाजी बाकाळकर यांनी लांजा नगरपंचायतीकडे विनंती अर्ज देवूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे बाकाळकर कुटुंबाने म्हटले आहे. अखेर जिल्हाधिकार्याकडे अर्ज करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. लांजा नागरपंचयातील दिलेल्या पत्रात कुटुंबाने म्हटले आहे की, लांजा शहरातून गेलेल्या मुंबई-गोवा महामार्ग ते शेट्ये यांच्या घरापर्यंत असणारा रस्ता नगरपंचायतीने मंजूर केला आहे. त्यापुढील आमच्या घरापर्यंत असणाऱ्या रस्त्याची नागरपंचयातीने पाहणी केली असून त्याची नोंद नगरपंचायतीने पायवाट म्हणून केली आहे. माझे घर पूर्णतः मोडकळीस आले असून त्याची दुरुस्ती करावयाची आहे. घरापर्यंत वाहन नेण्यास रस्ता नसल्याने घर दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य ने-आण करणे कठीण झाले आहे. तरी शेट्ये यांच्या घरापासून पुढे रस्ता मंजूर होण्याकरिता लांजा नगरपंचायतीमध्ये वारंवार भेट व माहिती दिली होती. त्यानंतर नगरपंचयातीने रस्त्याची पाहणी करून घराचे फोटो काढून घेतले होते. मात्र त्यापुढे काहीही कार्यवाही केलेली नाही. घर कोसळण्याच्या स्थितीत आले असून घर दुरुस्त करावयाचे आहे. मात्र नगरपंचायत सहकार्य करत नसल्याचे बाकाळकर कुटुंबाने म्हटले आहे. घर पडण्याच्या स्थितीत असून राहणे योग्य नसल्याच्या सूचना नगरपंचयातीने पत्रव्यवहार करून कुटुंबाला केल्या आहेत. असे असताना नगरपंचायत कुटुंबाला सहकार्य का करत नाही? असा सवाल बाकाळकर कुटुंबाने केला आहे. यासह शेजारी सुरू असणाऱ्या क्लबचे घाण पाणी, गटाराचे पाणी यामुळेही कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असल्याचे कुटुंबाने म्हटले आहे.