आम्ही लहानपणी एका वर्गात होतो. सातवीनंतर शाळा बदलल्या. आम्ही पांगलो. पुढे नोकरीपायी मी पुण्याबाहेर जाऊन आलो. निवृत्तीनंतर थोडा मोकळा झालो. सकाळी नियमित फिरायला जाऊ लागलो. आणि तीन वर्षांपूर्वी अचानक तो भेटला. माझ्या फिरायच्या वाटेवर त्याने लहान दुकान थाटले होते. किरकोळ गरजेच्या वस्तू आणि पहाटेच्या वेळी काही वर्तमानपत्रे विकायला ठेवलेली असत. सगळय़ा वस्तूंच्या पसाऱयामागे तो बसायचा. त्यामुळे त्याच्याकडे माझं लक्ष गेलं नसावं. पण त्याने मला ओळखून अचानक हाक मारली. आम्ही थोडय़ा गप्पा मारल्या. मग जाता येता मी त्याच्या दुकानातून छोटीमोठी खरेदी करू लागलो. रविवारी एखाद दुसरं इंग्रजी नियतकालिक घेऊ लागलो. कोरोनाची साथ मायबाप सरकारला दृग्गोचर झाली तेव्हाची गोष्ट. एके सकाळी तो मला म्हणाला, “विज्या, उद्या सकाळी लवकर ये, बरं का. शक्मयतो सहा-साडेसहापर्यंत ये. नंतर मी दुकान बंद करणार आहे.’’
“का रे? काय विशेष?’’
“उद्या जनता कर्फ्यू आहे. सात वाजता गव्हर्न्मेंट आकाशातून फुल्ल ऑल इंडियाभर कोरोनाचं मेडिसिन टाकणार आहे. मेडिसिन टाकल्यावर चौदा तास कर्फ्यू करायचा. म्हणजे रस्त्यावरचे सगळे कोरोनाचे किडे खलास होतील. नऊ वाजता सगळं सेफ झालं की. आपण घराबाहेर पडायचं.’’
“पण असं मी कुठल्याच पेपरमध्ये वाचलं नाही.’’
“या सगळय़ा सिपेट पॉलिसी असतात. गव्हर्न्मेंटला डिक्लेअर करता येत नाही.’’
“तुला कसं काय कळालं?’’
“आमच्या ग्रुपमध्ये मेसेज आलाय.’’
“बरं, बरं.’’
जनता कर्फ्यू पार पडला. नंतर सार्वजनिक बागा, वाचनालये, मंदिरे, हॉटेल्स वगैरे बंद पडली. कोरोनाच्या भीतीने आम्हीही घराबाहेर पडायचे बंदच झालो. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. लॉकडाऊन थोडासा शिथिल झाला. माणसं भीतभीत बागेत, वाचनालयात, मंदिरात, हॉटेलात जाऊ लागली. आपल्या ओळखीचं एखादं माणूस जर दिसत नसेल तर त्याची दबक्मया आवाजात चौकशी करू लागली.
दोन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावरून जाताना माझ्या मित्राचं दुकान बंद दिसलं. चौकशी केल्यावर कोणीतरी सांगितलं की तो…
बालपणी अचानक भेटलो, शाळा बदलल्यावर पांगलो, म्हातारे झाल्यावर अचानक भेटलो आणि कोरोनाच्या अवकृपेमुळे आता कायमची ताटातूट झाली. दैवाची क्रूर लीला अगाध आहे.








