प्रतिनिधी / कोल्हापूर
सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 26) देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जिह्यातील सात लाख शासकिय, निमशासकिय कर्मचारी, कामगार, शिक्षक सहभागी होणार आहेत. या दिवशी सर्व शासकिय,निमशासकिय कार्यालये बंद राहतील, अशी माहिती सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती व कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
लवेकर म्हणाले, या संपात शासकिय, निमशासकिय कर्मचारी, कामगार, शिक्षक, आयटक, सिटू, सर्व श्रमिक संघ यांच्याशी संबंधित कामगार, एमएसईबी, राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी, माथाडी कामगार संघटना, शासकिय मालवाहतूक कॉन्ट्रक्टर संघटना आदी 50 संघटनांचा सहभाग असणार आहे. गुरुवारी (दि. 26) सकाळी 10 वाजता टाऊन हॉल उद्यान येथे सर्वजण एकत्र जमणारा आहेत. या ठिकाणी वक्त्यांची भाषणे होतील. त्यानंतर आंदोलक पदफेरीने दसरा चौकात जातील व या ठिकाणी समारोप होईल. येथे समारोपाचे भाषण होऊन सर्वजण आपापल्या घरी निघून जातील. त्याचबरोबर तालुकास्तरावर ही स्वतंत्रपणे संप होईल. संपा दरम्यान एक दिवस सर्व शासकिय कार्यालये बंद राहतील.
यावेळी कॉ. दिलीप पवार, कॉ. चंद्रकांत यादव, अतुल दिघे, एस. बी. पाटील, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, राजेश वरक, भरत रसाळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सुधाकर भांदीगरे, अनिल खोत, विठ्ठल वेलणकर, नंदकुमार इंगवले, सुवर्णा तळेकर आदी उपस्थित होते.