आयएमए फसवणूक प्रकरण : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बेंगळूर : आयएमए फसवणूकप्रकरणी कंपनीचे संस्थापक मन्सूर खान यांच्या दबावाखाली सीबीआयने माजी मंत्री रोशन बेग यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांना सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रोशन बेग यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची परप्पन कारागृहात रवानगी करण्यात आली.
यापूर्वी सीबीआयने दोनवेळा नोटीस पाठवून बेग यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांची कोणतीच चौकशी केली नव्हती. दरम्यान, मन्सूर खानने आपण रोशन बेग यांना काही रक्कम दिली आहे. ही रक्कम त्यांच्याकडूनच वसूल करावी, असे सांगितले होते. तसेच एखाद्यावेळेस ही रक्कम वसूल न केल्यास सीबीआयविरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा मन्सूर खानने दिला होता, असे चौकशीवेळी उघडकीस आले आहे. रोशन बेग यांना 200 कोटी रुपयांसह महागडी कार, अन्य वस्तू दिल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, मन्सूर खानने दबाव टाकल्यामुळे रविवारी सकाळी सीबीआय अधिकाऱयांनी रोशन बेग यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. तसेच सायंकाळपर्यंत त्यांची चौकशी करून ताब्यात घेतले.









