क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. वास्कोतील टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड संघाने मुंबईला एकमेव गोलने पराभूत केले. सामन्याच्या 49व्या मिनिटाला वॅसी अप्पीहने नोंदविलेला पॅनल्टीवरील गोल नॉर्थईस्टला 3 गुणांची कमाई करून देणारा ठरला. या सामन्यात अहमद जोहूला रेड कार्ड पडल्याने तब्बल 53 मिनिटे मुंबई सिटी एफसीला दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले.
स्पेनचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटीने सुरूवात चांगली केली होती, पण नवीन प्रशिक्षक जेरार्ड न्यूस यांच्या प्रशिक्षणाखाली नॉर्थईस्ट युनायटेडने प्रतिस्पर्धी संघ कमकुवत पडल्यानंतर मिळालेल्या संधीचे सोने केले आणि विजयाचे पूर्ण गुण कमविले.
सामन्याची प्रथम 20 मिनिटांच्या खेळावर निर्विवादपणे मुंबई सिटी एफसी संघाचे वर्चस्व होते. सामन्याच्या सातव्याच मिनिटाला मुंबई सिटीने आपली पहिली आक्रमक चाल रचली. यावेळी हर्नन सांतानाने केलेल्या क्रॉसवर ताबा मिळविण्यात बार्थोलोमियोव ओगबेची अपयशी ठरला. नॉर्थईस्ट युनायटेडने सामन्याच्या 11व्या मिनिटाला मुंबई सिटी संघाच्या बचावकक्षेत पहिल्यांदाच प्रवेश केला. मात्र यावेळी त्यांच्या लुईस मिंगेल व्हियेराचा फटका मुंबई सिटीचा बचावपटू सार्थक गोलायने परतावून लावला.
मुंबई सिटीची आक्रमणाची मालिका नंतरही चालूच राहिली. प्रथम 15व्या मिनिटाला कप्तान हय़ुगो बुमोसने दिलेल्या पासवर अहमद जोहूने दिशाहीन फटका मारला तर लगेच रेनियर फर्नांडिसने दिलेल्या पासवर रॉवलीन बॉर्जिसचा गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला. मध्यंतराला दोन मिनिटे शिल्लक असताना मुंबई सिटीला झटका बसला. त्यांचा प्लेमेकर मीडफिल्डर अहमद जोहूला रफ खेळाबद्दल रेफ्रीने रेड कार्ड दाखविले. यामुळे मुंबई सिटी एफसीला उर्वरीत वेळेत दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले.
प्लेमेकर जोहूच्या जाण्याने मुंबई सिटीच्या खेळावर परिणाम झाला. याचा फायदा घेत नॉर्थईस्ट युनायटेडने गोल नोंदविला. शॉर्ट कॉर्नरवर डायलन फॉक्सचा हेडर मुंबई सिटीच्या डी कक्षेत रॉवलीन बॉर्जिसने चेंडूला हाथाळल्याबद्दल रेफ्री एस. व्यंकटेशने दिल्या पॅनल्टीर वॅसी अप्पीहने सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगला भेदले आणि नॉर्थईस्टला आघाडी मिळवून दिली.
या गोलने नॉर्थईस्टचा खेळ अधिक बहरला. त्यानंतर त्यांनी दोन बदल केले आाrण रेंपुईया आणि ब्रिटो यांच्या स्थानावर अधिक आक्रमकता आणण्यासाठी माशादो आणि गाल्लेगो यांना संधी दिली. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेले प्रशिक्षक लॉबेराच्या खेळाडूंनी कालच्या सामन्यात साफ निराशा केली. 68व्या मिनिटाला मिळालेल्या लागोपाठ दोन पॅनल्टी कॉर्नरचाही मुंबई सिटीसाठी काहीच उपयोग झाला नाही.
मुंबई सिटीचा स्पर्धेतील दुसरा सामना आता 25 नोव्हेंबर रोजी एफसी गोवा विरूद्ध फातोर्डा स्टेडियमवर होणार आहे. एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक सर्जिओ लॉबेराविरूद्धच्या मुंबई संघाविरूद्ध हा सामना होणार आहे.