जिह्याचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी/ बेळगाव
जिह्यातील प्रत्येक शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयांची उपलब्धता करावी. याचबरोबर अंगणवाडी शाळांमध्ये विजेची सोय करावी, यासाठी विशेष अभियान राबवा, अशी सूचना जिह्याचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी अधिकाऱयांनी केली आहे. जिल्हा पंचायतीच्या सभागृहामध्ये अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी जिह्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱयांना समस्या सोडविण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले.
जिह्यातील प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणीपुरवठा कसा होईल, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यासाठी आतापासूनच विहिरींची खोदाई याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे पाईप व जलकुंभ यांचा आराखडा तयार करून तो पाठविणे महत्त्वाचे आहे. विशेषकरून निपाणी, बेळगाव, कागवाड या भागामध्ये नरेगाअंतर्गत विविध कामे पूर्ण करावीत, अशी सूचनादेखील त्यांनी केली.
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे सरकारने दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षणाची सोय केली आहे. काही कुटुंबांकडे टीव्ही नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून त्यासाठी ग्राम पंचायतीने आपल्या कार्यालयाच्या परिसरात टीव्ही उपलब्ध करून विद्यार्थ्यांना देण्याबाबत त्यांनी सूचना केली. यासाठी ग्राम पंचायतींना थेट अनुदान देण्यात आले असून पीडीओंनी याबाबत पाऊल उचलावे, असे त्यांनी सांगितले. काही गावांमधील कुटुंबांकडे शौचालय बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना सार्वजनिक शौचालये बांधून उपलब्ध करावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पावसामुळे अनेक रस्ते, पूल खराब झाले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आराखडा तयार करून पाठवून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. ज्या परिसरामध्ये अधिक नुकसान झाले आहे त्या भागात विशेष लक्ष देऊन अशा समस्या सोडविण्यावर अधिकाऱयांनी भर द्यावा, असे अधिकाऱयांना सुनावले आहे.
महापुरामुळे 31 हजार शेतकऱयांना 20 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्याबाबत सर्व्हे करून संबंधित शेतकऱयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. रब्बी हंगामासाठी शेतकऱयांना बियाणे तसेच खते उपलब्ध आहेत की नाही याची चौकशी केली. यावेळी कृषी विभागाचे संचालक शिवगोंडा पाटील यांनी सध्या 27 हजार मॅट्रिक टन खत उपलब्ध आहे. शेतकऱयांसाठी 20 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आली होती. त्यामधील 15 हजार क्विंटल बियाणांचे वितरण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
कोविडबाबत अजूनही दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. कारण कोविड वाढण्याची भीती पुन्हा व्यक्त होत आहे. त्यासाठी आतापासूनच आरोग्य विभागाने पूर्वतयारी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. 428 जणच सक्रीय रुग्ण आहेत असे आरोग्य अधिकाऱयांनी यावेळी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. व इतर अधिकारी उपस्थित होते.









