पुलाची शिरोली / वार्ताहर
कामगारांची भविष्य कल्याण निधीची १५ लाख इतकी रक्कम स्वतःच्या फायद्याकरीता अप्रामाणिकपणे वापरल्याबद्दल शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका बंद असलेल्या कंपनीच्या मालकावर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . याबाबतची फिर्याद भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे कर्मचारी प्रकाश जयपाल नाईक रा. कोल्हापूर (नाळे कॉलनी) यांनी दिली आहे. या कंपनीच्या दोघा संचालकांनी संगनमताने स्वतःच्या फायद्याकरीता १५ लाख १७ हजार इतकी रक्कम वापरली आहे . शिरोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरोली औद्योगिक वसाहतीमधील गेल्या अडीच वर्षापासून बंद असलेल्या एका नामांकित कंपनीच्या मालकांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात आलेली पंधरा लाख सतरा हजार इतकी रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आहे.
ही रक्कम परत मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे जिल्हा सचिव प्रदीप विलास कांबळे यांनी भविष्य कल्याण निधी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनीच्या संपूर्ण दप्तराची तपासणी केली असता सप्टेंबर २०१४ ते मे २०१९ या कालावधीमध्ये ही रक्कम स्वतःच्या फायद्याकरीता वापरली असल्याचे निदर्शनास आले आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी एस .बी .मुल्ला हे करत आहेत.









