शिराळा / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शिराळा नगरपंचायत, पंचमहाभूतांच्या जतन व संवर्धनासाठी ‘शिराळा शहर हरित शहर’ही मोहीम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून शिराळा नगरपंचायतीने दर गुरुवार, ‘नो व्हेईकल डे !’ पाळण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाची सुरुवात मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी शिराळा नगरपंचायत येथून केली. स्वत: सायकल वरून शहरात फेरी मारली.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विकास मंत्रालयाकडून , 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021. या कालावधीत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभागी आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासाठी शिराळा नगरपंचायतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतीच नगरपंचायतीच्या वतीने पंधराशे झाडे लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यासाठी शहरातून वाहत येणाऱ्या सांडपाण्याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरणाचे रक्षण एकाच वेळी होणार आहे.
प्रदुषणास कारणीभूत ठरणा-या वाहनांचा वापर टाळून पर्यावरणपूरक व आरोग्यदायी मार्गांचा वापर करून कार्यालयाचे दैंनदिन कामकाज पार पाडले जाईल.आजपासून सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमास शहरातील नागरीक, विविध संस्था तसेच नगरसेवक यांनी शुभेच्छा दिल्या.नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी आपल्या निवासस्थानापासून नगरपंचायतीपर्यंत सायकलवरून प्रवास केला. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना बसवेश्वर शेटे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाची सुरूवात स्वत:पासून करून मुख्याधिकारी यांनी संपुर्ण शिराळा शहराला ‘शिराळा शहर हरित शहर’ संकल्पना पुर्णत्वास नेणेच्या उद्देशाने उपक्रमात सहभागी होणेबाबत आवाहन केले. यापुढील प्रत्येक गुरूवारी अधिक नाविन्यपुर्ण पध्दतीने या उपक्रमाचे आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.शिराळा नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील या अभिनव उपक्रमात सहभाग नोंदविला.








