संगमेश्वर चोरवणे येथील गणपत भायजे कुटुंबियांचे परिवर्तनवादी पाऊल : झाडे उत्पन्न देतील तर पुस्तके बलवान बुध्दी, निर्भिड जगण्याचे धाडस देतात
प्रतिनिधी / रत्नागिरी
भाऊबिजेच्या दिवशी बहीण-भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करते…त्याला प्रेमाचा टीळा लावते…भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिना असे वस्तू ओवाळणीत टाकतो. या वस्तू घरात पडून राहतात. पण संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे गावच्या गणपत भायजे कुटुंबियांनी अनोखी विचार परिवर्तनाची ‘भाऊबिज’ साजरी करत समाजप्रबोधनाचा संदेश दिला. त्यांनी भाऊबिज भेट म्हणून झाडे व युगपुरूषांची पुस्तके एकमेकांना दिली.
‘भाऊबीज’ हा भाऊ-बहिणीचे अतूट नातेसंबंध जोडणारा सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो. बहिणीकडून भावाची ओवाळणी होते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ’ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो. विविध प्रांतात या दिवशी विविध प्रथा साजऱया होतात. या दिवशी बहीण-भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते. त्याला प्रेमाचा टीळा लावते. तो टीळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव रहावा, हा या मागचा उद्देश असतो. या दिवशी भाऊराया बहिणींच्या घरी जाऊन त्या ठिकाणी ओवाळणी व भेटवस्तू प्रदान केली जाते. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिना आदी वस्तू ओवाळणी टाकतो व बहीणही भावाला वस्तूरुपी भेटवस्तू प्रदान करते. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशालपण यावरून दिसून येत.s
संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे या गावी गणपत भायजे, त्यांची पत्नी जयश्री भायजे तसेच त्यांची मुलगी संपदा भायजे यांनी भाऊबीजेनिमित्ताने विचार परिवर्तनाची अनोखी भाऊबिज साजरी केली. त्यांनी आपल्या भावा-बहिणांना लिबाचं झाड व महापुरूषांच्या विचारपरिवर्तनाची पुस्तके भेट देऊन अनोखी भाऊबीज साजरी केली. ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देऊन बाकीच्या वस्तू घरांत पडून राहतात. पण झाडे उत्पन्न देतील आणि पुस्तके मन मस्तिस्क बलवान करून निर्भीड जगण्याचे धाडस निर्माण करतील, असे युगपुरुष सम्राट बळीराजा प्रतिष्ठान चोरवणे अध्यक्ष गणपत यांनी सांगितले.









