प्रतिनिधी / खेड
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर २१ नोव्हेंबरपासून दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने कोचुवेली श्री गंगानगर साप्ताहिक विशेष गाडी वसईमार्गे चालवण्यात येणार आहे.
कोविड संकटामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना ब्रेक लागला होता. मात्र, कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून एकामागोमाग एक विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. विशेषतः साप्ताहिक गाड्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांची चांगली सोय होत असून सर्वच रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने आणखी एक साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार २१ नोव्हेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत कोचुवेली – श्री गंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस धावणार आहे. दर शनिवारी सायं. ३.४५ वाजता ही गाडी कोचुवेली येथून सुटून चौथ्या दिवशी दुपारी २.१५ वाजला श्री गंगानगरला पोहचेल. परतीच्या प्रवासात दर मंगलवारी दुपारी १२.३० वाजता श्री गंगानगर येथून सुटून तिसऱ्या दिवशी ७.१० वाजता कोचुवेलीला पोहचेल. २२ डब्यांच्या या साप्ताहिक गाडीला कोकण मार्गावर पनवेल, माणगाव, रत्नागिरी, कुडाळ आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.









