प्रशासनाच्या विविध खात्यांतर्फे आयोजन : मुलांच्या हक्काबाबत जनजागृती
प्रतिनिधी / बेळगाव
बालहक्क आणि त्यांचे संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी कर्नाटक राज्य बालहक्क रक्षण आयोग आणि जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, महिला आणि बाल कल्याण विभाग जिल्हा बालरक्षण विभाग यांच्यावतीने शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी मुलांचे हक्क आणि त्यांना संरक्षणाबाबत फलक घेऊन जनजागृती करण्यात आली.
या रॅलीचे उद्घाटन न्यायालयाच्या आवारात करण्यात आले. जिल्हा मुख्य न्यायायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, प्रमुख पाहुणे म्हणून बालहक्क रक्षण समितीच्या सदस्या भारती वाळवेकर, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. दर्शन, गुन्हे तपास व रहदारी विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ, महिला आणि बालकल्याण खात्याचे उपनिर्देशक बसवराज वरवट्टी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
शहरातून रॅली काढुन मुलांच्या हक्काबाबत जनजागृती करण्यात आली. मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये यासाठी पालकांनी कायद्याची माहिती समजून घ्यावी, मुलांना त्रास झाल्यास बालसहाय्य केंद्र 1098 याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यावेळी बालहक्क रक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या. न्यायालयाच्या आवारातच रॅलीची सांगता झाली.









