वार्ताहर / मौजेदापोली
टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका पर्यटकांच्या येण्याने हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.असे असले तरी मात्र मास्कचे नियम अद्याप शासनाने उठविलेले नसून हे नियम मात्र अनेक ठिकाणी धाब्यावर बसविले जात आहेत.
दापोली तालुक्यातील कर्दे, मुरूड, हर्णै, पाळंदे, लाडघर अशा मुख्य पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी गेले चार ते पाच दिवसांपासून गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना नंतर हॉटेल, रिसॉर्ट यांना परवानगी मिळाल्याने अनेक महिने घरात बंदीस्त राहीलेले पर्यटकांनी पर्यटनासाठी मिनी महाबळेश्वरची वाट धरली. दिवाळीत दापोली तालुक्यातील समुद्रकिनारे हाऊसफुल्ल झाले. परंतु कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र या शासनाच्या नियमांना मात्र धाब्यावर बसवले जात आहे. स्थानिक ग्रामपंचायती देखील याकडे लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.