प्रतिनिधी/ वास्को
लॉकडाऊनच्या काळात मार्चपासून बंद राहिलेली वास्को ते यशवंतपूर ही प्रवासी रेल्वे सेवा काल मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली. काल रात्री 9.20 वा. वास्को रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे यशवंतपूर येथे जाण्यासाठी रवाना झाली. आज बुधवारी दुपारी 12.30 वा. यशवंतपूरला पोहोचेल.
आज बुधवारी दुपारी 2.30 वा. यशवंतपूरहून वास्कोला येण्यासठी ही प्रवासी रेल्वे निघणार असून गुरूवारी पहाटे 6 वा. ती वास्कोत पोहोचेल. या मार्गावर सुरू करण्यात आलेली ही प्रवासी रेल्वे सेवा आता दररोज उपलब्ध असणार आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर होताच इतर रेल्वे सेवांबरोबरच वास्को यशवंतपूर ही रेल्वेसेवाही बंद करण्यात आली होती. महिनाभरापूर्वी गोवा दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस ही सेवा सुरू करण्यात आली होती. आता वास्को यशवंतपूर ही सेवाही सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे.









