बंगाली चित्रपटाला भारतीय सिनेमा आणि वैश्विक बनवण्याचे कार्य केले ते सत्यजित रे यांनी. यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. या वर्षातच त्यांच्या नायकाने, ज्ये÷ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. भारतीय नायक, अभिनेता म्हणून जगभरात आणि वास्तवदर्शी चित्रपटांच्या क्षेत्रात सौमित्र चटर्जी यांना एक आगळे स्थान होते. दादासाहेब फाळके पुरस्कार हा देशातील सर्वोच्च आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘लेजन ऑफ ऑनर’ असे पुरस्कार सहज कोणाला मिळत नाहीत. सौमित्र चटर्जी यांनी भारतीय सिनेमासाठी जीवन खर्ची घातले. मात्र दुर्दैव असे की जगभर भोवती गराडा पडत असताना बंगाली आणि भारतभरातील फिल्म सोसायटय़ांमधील रसिक वगळता ते सामान्य भारतीय रसिकांना अपरिचितच राहिले. सत्यजित रे यांच्या क्रांतिकारी ‘पथेर पांचाली’ चित्रत्रयीतील शेवटचा चित्रपट ‘अपूर संसार’मध्ये युवा बेरोजगार संसारी अपू ही त्यांची पहिली भूमिका. तत्पूर्वी रंगभूमी आणि रेडिओ निवेदक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक शिशिरकुमार भादुरी त्यांच्या नजरेसमोर असणारा हा युवक. 1956 साली ‘नीला चोले महाप्रभू’ या चित्रपटासाठी भादुरी यांनी त्यांना ’नॉट सुटेबल’ ठरवले. पण सत्यजित रे यांना त्यांच्यात तत्कालीन बंगाली अस्वस्थपणा दाखवू शकणारा आशावादी युवक दिसला. सत्यजित रे यांची निरीक्षणशक्ती ग्रेटच. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याचे चित्र ते स्वतः रेखाटत त्याच पद्धतीने चित्रीकरण होई. पथेर पांचाली चे संगीत प्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांचे होते. त्यांच्या एका मैफलीवर ’अ सितार रिसायटल बाय रविशंकर’ नावाचा लघुपट करण्यासाठी त्यांनी रविशंकर यांची अनेक चित्रे बनवली, पण काम तसेच थांबले. 1978 साली रविशंकर यांचे गंगेच्या काठी उभे असलेले चित्र पाहून मात्र सत्यजित रे यांनी लघुपटाचा इरादा रद्द केला. अशा दिग्दर्शकाने त्यापूर्वी नॉट सुटेबल ठरलेल्या सौमित्र चॅटर्जी यांना आपल्या सिनेमाचा नायक ठरवले. चित्रपटात नायिका अपर्णाच्या (शर्मिला टागोर-पहिलाच चित्रपट) मातेच्या तोंडी एक वाक्मय होते, अपू हा मला श्रीकृष्णासारखा आपला/ओळखीचा वाटतो! एका पात्राच्या मुखातून दिग्दर्शकाने आपल्या नवख्या नायकाबद्दल केलेले हे भाष्य होते. वैशिष्ट म्हणजे चटर्जी यांना मात्र आपल्या घरातील इतर पुरुषांपेक्षा आपण देखणे नाही याचा न्यूनगंड होता! पहिले दृश्य साकारताना येणारी उदासी लक्षात घेऊन त्यांनी, सुशिक्षित अपू नोकरी मिळावी म्हणून बॉटलिंग आणि पॅकेजिंग कारखान्यात जातो आणि तिथल्या कामगारांची स्थिती पाहून उदास होऊन मागे फिरतो इतकेच दृश्य चित्रित करायचे ठरवले. पहिल्या फटक्मयात ते यशस्वी झाले आणि नायकाला स्वतःबद्दल खात्री निर्माण झाली. मध्ये चित्रीकरण बंद असताना अपूने या तीन दिवसात काय केले असते याची एक टिप्पण वही सौमित्र चटर्जी यांनी बनवली आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांना दिली. भूमिकेबद्दल नायक किती गांभीर्याने विचार करतो आहे याचा अंदाज त्यांना पहिल्याच चित्रपटात आला आणि पुढे सौमित्र चटर्जी हे सत्यजित रे यांच्या तब्बल चौदा चित्रपटांचे नायक बनले. सुंदर चेहरा आणि बासरी वादक, बेरोजगार युवक, रस्त्याने काव्य गाणारा साहित्यिक, बावरलेला पती, पत्नीच्या मृत्युने घायाळ हिंसक झालेला नायक, स्वतःच्या मुलाकडे आशेने पाहणारा आणि त्याला खांद्यावर उचलून चालू लागणारा अपू केवळ सुंदर दिसतो म्हणून लोकांना भावला असे नाही तर चटर्जी यांनी त्या चित्रपटावर आपली छाप पाडली हेच दिसून येते. चारुशीला या रवींद्रनाथ टागोरांच्या आयुष्यातील घटनेवरील चित्रपटात त्यांना सत्यजित रे यांनी अमल ही रवींद्रनाथांची भूमिका साकारायला लावली. तिसरी भूमिका फेलूदाची! मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करणाऱया वैज्ञानिक प्रोफेसर शंकू आणि डिटेक्टिव्ह फेलुदा या दोन व्यक्तिरेखांच्या कथा लोकांनी डोक्मयावर घेतल्या. फेलुदाची भूमिका सौमित्र चटर्जी यांनी केली होती. पुढे त्याच्या कथांचे कॉमिक्स बंगाली आणि इतर भारतीय भाषांमध्ये प्रचंड गाजले. सौमित्र चटर्जी त्या कॉमिक फेलूदाचा कायमचा चेहरा बनून गेले. जवळपास अडिचशे चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. सत्यजित रे यांच्या व्यतिरिक्त मृणाल सेन यांच्याकडेही त्यांनी काम केले. एका चित्रपटाचे गंभीर चित्रीकरण सुरू असताना चटर्जी यांच्या चेहऱयावर हास्य असल्याचे सत्यजित रे यांनी जाणले आणि हसण्यामागचे कारण विचारले. तेव्हा आपल्या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका केल्या असताना आपण कशात अडकलोय म्हणून मी स्वतःवर हसलो असे त्यांनी सांगितले. तुम्ही एक व्यावसायिक कलाकार आहात आणि आपण स्वीकारलेली भूमिका सफाईदारपणे करणे हे व्यावसायिक म्हणून आपले कर्तव्य आहे असे सत्यजित रे यांनी त्यांना बजावले आणि तशी चूक त्यांनी आयुष्यात पुन्हा कधीही केली नाही. भादुरी यांनी एकदा चित्रपटात अभिनेता वेगळा अभिनय करत नाही दिग्दर्शकच सर्व भूमिका पार पडत असतो अशी भूमिका मांडली. या मताशी चटर्जी कधीही सहमत झाले नाहीत. चित्रपट बनवणे ही दिग्दर्शकाची जबाबदारी आहे. तो त्या जहाजाचा कॅप्टन. पण त्याबरोबरच अनेक लोक त्यात योगदान देतात. त्यांना नाकारता येणार नाही. मात्र चित्रपट हा दिग्दर्शकाच्या नावेच ओळखला गेला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आपल्या जडणघडणीचे श्रेय मात्र ते दिग्दर्शक सत्यजित रे यांनाच देत. त्या काळातील व्यावसायिक चित्रपटाचे यशस्वी नायक उत्तम कुमार यांच्याशी कलेच्या बाबतीत तुलना करून चटर्जी श्रेष्ठ असल्याचे म्हटले होते. ‘जिंदेर बंदी’ चित्रपटात उत्तम कुमार नायक तर चटर्जी खलनायक म्हणून गाजले. ‘अभिजन’ चित्रपटातील त्यांची वेगळी भूमिका ही लक्षात राहण्यासारखी. तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तरी आपल्या प्रसिद्ध 14 व्यक्तिरेखांना पुरस्कार न मिळाल्याने त्यांना पुरस्काराचे अप्रूप वाटणे बंद झाले होते. वैशिष्टय़ म्हणजे त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे पुरस्कार आले. आयुष्याच्या उतारवयात वाटय़ाला आलेला चित्रपट पूर्ण करूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि आपल्या निष्ठचे दर्शन घडवले.
Previous Articleशतकानुशतकांची दिवाळी
Next Article कडेगावात आज फुटणार ऊसदराची कोंडी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.