बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची आवश्यकत असते. कोरोना काळात ऑक्सिजनला मोठ्या प्रमाणात मागणी होती. राज्यात बऱ्याच वेळेला ऑक्सिजनची कमतरता भासली होती. दरम्यान राज्यात बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना ऑक्सिजनच्या मागणीतही घट होताना दिसत आहे. राज्यात ऑक्सिजनची मागणी ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये दररोज ५०० मेट्रिक टन आणि नोव्हेंबरमध्ये दररोज केवळ २००-२५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार ५ नोव्हेंबर रोजी राज्यातील रुग्णालयांमध्ये २७१ मेट्रिक टन ऑक्सिजन लागला. परंतु दुसर्याच दिवशी मागणीत मेट्रीक ९८ टनांची घट झाली. ७ नोव्हेंबर रोजी २४२ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासली. बेंगळूरमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा वापर जास्त आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी बेंगळूरमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते.
आरोग्य आयुक्त पंकजकुमार पांडे यांनी कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वीपेक्षा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होणारे रुग्णही कमी झाले आहेत. तज्ञांच्या मते, नजीकच्या काळात या प्रकरणांमध्ये वाढ झाली तर ऑक्सिजनची मागणी पुन्हा वाढेल. म्हणून ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे, असे ते म्हणाले.









