एपीएमसी पोलिसांची कारवाई : संशयितांकडून साडेचार लाख रुपये जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
कुवेंपुनगर येथील 8 व्या क्रॉसवरील घरातील कपाटात ठेवण्यात आलेले 4 लाख 50 हजार रुपये चोरटय़ांनी लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी अवघ्या काही तासातच दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून 4 लाख 50 हजार रुपये जप्त केले आहेत. मरियम्मा बाबू परशिपोगू (वय 38, रा. बंजारा कॉलनी पहिला क्रॉस बेळगाव) आणि अनिता यल्लप्पा कांबळे (वय 32, रा. जनता कॉलनी बाची, ता. बेळगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कुवेंपुनगर येथे राहणारे योगेश भरत छाबडा हे आपल्या कुटुंबासमवेत आत घरामध्ये होते. यावेळी अचानक चोरटय़ांनी कपाटातील 4 लाख 50 हजार रुपये लांबविले. छाबडा यांनी बुधवार दि. 11 रोजी कामासाठी ती रक्कम बँकेतून आणून ठेवली होती. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ती रक्कम घेण्यासाठी कपाट उघडले असता कपाटात रक्कम नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नेमकी रक्कम कोणी चोरली? असा प्रश्न पडला होता.
घरातील कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सध्या दीपावलीचा सण असल्याने सर्वजण विविध कामांमध्ये आणि स्वयंपाकघरामध्ये गुंतले होते. त्यावेळी अचानक रात्री 9 ते 10 या वेळेत ही रक्कम गेल्याची फिर्याद नोंदविण्यात आली होती. इतकी मोठी रक्कम गेल्यामुळे छाबडा कुटुंबीयांना धक्काच बसला होता.
योगेश छाबडा हे व्यावसायिक आहे. त्यामुळे त्यांची उलाढाल असते. वरचेवर रक्कम आणून देवघेव केली जाते. त्यामुळे यावेळीही त्यांनी रक्कम आणून घरात ठेवली होती. मात्र, ती रक्कमच चोरीला गेली होती. या घटनेनंतर योगेश छाबडा यांनी एपीएमसी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास हाती घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.









