126 जणांना अटक : 56 लाख रुपये जप्त : हुबळी-धारवाड महानगर पोलिसांची कारवाई
वार्ताहर/ हुबळी
धारवाड येथील प्रिती लॉज आणि रम्या रेसिडेन्सी येथील जुगार अड्डय़ावर छापा टाकून राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसह 126 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 56 लाख रुपये जप्त करण्यात आले. हुबळी-धारवाड महानगर पोलिसांनी सदर कारवाई केली.
या कारवाईची माहिती देताना बेळगाव विभागाचे आयजीपी राघवेंद्र सुहास यांनी सांगितले की, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे 126 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धारवाडमधील प्रिती लॉजवर पोलिसांनी छापा टाकून 70 जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून 65 मोबाईल, 7 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर रम्या रेसिडेन्सीवर टाकलेल्या छाप्यात 56 जणांना अटक करून 49 लाख रुपये जप्त केले आहेत. तसेच सुमारे 34 कार पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. याचबरोबर संशयितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून न्यायालयात हजर केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
दिवाळी सणाच्या नावाखाली शनिवारी रात्रीपासून जुगार खेळत असल्याची माहिती हुबळी-धारवाड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी पी. कृष्णकांत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने योग्य सापळा रचून ही कारवाई केली आहे. दरम्यान, राजकारणी आणि पोलिसांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.









