ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा शपथविधी काही तासांवर आला असून, राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची माळ दोघांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रविवारी सायंकाळी नितीशकुमार यांनी NDA च्या चारही घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपाल फगू चौहान यांना सादर केले. त्यावेळी नितीश कुमार यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार सुशीलकुमार मोदी त्यावेळी नव्हते. त्यामुळे माध्यमांनी सुशीलकुमार मोदी हेच उपमुख्यमंत्री असतील का, असे विचारले असता राजनाथसिंह यांनी याबाबतचा निर्णय योग्य वेळी समजेल, असे सांगितले. त्यामुळे मोदी यांना डच्चू देण्यात येणार असल्याचे चित्र दिसते.
दरम्यान, भाजपने कटीहारचे आमदार तारकिशोर प्रसाद यांची बिहार भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. तर रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड झाली आहे. या दोघांनाही उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.