भारतीय सैन्याचा दबदबा केला मान्य : 11 जवान ठार झाल्याची माहिती
इस्लामाबाद, श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱया 11 पाकिस्तानी जवानांना भारतीय सैन्याने ठार केले. भारताच्या या बेधडक कारवाईमुळे घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या इतर दहशतवाद्यांना पळ काढावा लागला. आपली ही फजिती जगापुढे येऊ नये, यासाठी पाकिस्तानी सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तान समर्थक नेत्यांनीच भारतीय सैन्याची ताकद मान्य करत भारताच्या प्रतिहल्ल्यात 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेतून पाकिस्तानच्या कुरघोडय़ा त्यांच्यावरच उलटल्याचेही स्पष्ट झाले आहेत.
देशभर साजऱया होणाऱया दिवाळीच्या उत्साहावर विरजण टाकण्याचे पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार भारतीय सैन्याने नीलम आणि लीपा खोऱयात आपली छाप पाडली आहे. मुजफ्फराबादमधील नौशेरा प्रांतातही भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना सळो की पळो केले. नीलम खोऱयाचे उपायुक्त राज महमूद शाहीद यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कमीत कमी 15 घरांचे नुकसान झाल्याचा दावाही पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा भंग केला होता. यानंतर झालेल्या संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे तंबू, खंदक आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे दर्शवणारी चित्रफीत भारतीय लष्कराने प्रसारित केली आहे.
इम्रान खान टीकेचे लक्ष्य
भारताच्या प्रत्युत्तराने बिथरलेल्या पाकव्याप्त काश्मीरचे कथित पंतप्रधान राजा फारूख हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. नियंत्रण रेषेवरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोण जबाबदार आहे आणि अशाप्रकारे मोठय़ा नुकसानीचा आम्हाला कधीपर्यंत सामना करावा लागणार आहे हे इम्रान खान यांनी स्पष्ट करावे, असे त्यांनी म्हटले आहे.









