ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल : रात्री उशिराने घरी जाणाऱया नागरिकांची गैरसोय
बेळगाव / प्रतिनिधी
तालुक्मयाच्या ग्रामीण भागातील काही गावांची वस्तीची बस विस्कळीत झाल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसाय टाळण्यासाठी रात्री आठनंतर वस्तीच्या गाडय़ा धावत असतात. त्यामुळे रात्री उशिराने प्रवास करणाऱया प्रवाशांना या बस सोयीस्कर ठरतात. मात्र, कोरोनामुळे काही गावांतील बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. काही गावच्या वस्तीच्या बसदेखील बंद झाल्या आहेत. त्यामुळे रात्री उशिराने प्रवास करणाऱया नागरिकांची गैरसोय होत आहे.
दिवाळी सणाच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात नागरिक बाजारात येत आहेत. गर्दीतून बाजार करून घरी जाण्यासाठी नागरिकांना उशीर होत आहे. मात्र, बसथांब्यावर आल्यानंतर वस्तीच्या बस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. काही वेळेला स्पेशल खासगी वाहने भाडय़ाने घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. विशेषकरून तालुक्मयातील कडोली, मुचंडी, अष्टे, कोनेवाडी, बाकनूर, अतिवाड गावांतील वस्तीच्या बसेस अनियमित झाल्याने या गावच्या बसवर अवलंबून असणाऱया प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड देत घरी पोहोचावे लागत आहे. याची तातडीने दखल घेऊन परिवहनने ग्रामीण भागातील वस्तीच्या बस पूर्ववत कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.









