प्रतिनिधी / बेंगळूर
विधानसभा पोटनिवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीत यश मिळविल्यानंतर आता भाजपने विधानपरिषदेचे सभापतीपद मिळविण्यासाठी निजदशी हातमिळवणी करण्याची तयारी चालविली आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळाल्याने विधानपरिषदेत भाजपचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे निजदशी हातमिळवणी करून काँग्रेसकडून निवड झालेल्या सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांना हटवून भाजपच्या सदस्याला सभापती बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
विधानपरिषदेत एकूण 75 जागांपैकी 31 जागा भाजपकडे आहेत. तर काँग्रेसकडे 28, निजदकडे 14, अपक्ष 1 आणि 1 सभापती असे सदस्य आहेत. स्पष्ट बहुमतासाठी 38 सदस्यांची आवश्यकता आहे. मात्र, स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाकडे नाही. याआधी निजदच्या पाठिंब्यावर विधानपरिषदेवर काँग्रेसचा सभापती निवडण्यात आला होता. आता निजदमध्ये युती करून भाजप आपल्या पक्षातील सदस्याला सभापती बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
यापूर्वी युतीचे सरकार असताना काँग्रेसकडे सभापतीपद तर निजदकडे उपसभापतीपद होते. निजदशी युती करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनावेळी सभापती प्रतापचंद्र शेट्टी पायउतार होण्याची शक्यता आहे.









