‘हाय बेंगळूर’च्या कार्यालयात हृदयविकाराचा धक्का
प्रतिनिधी / बेंगळूर
ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि ‘हाय बेंगळूर’ साप्ताहिकाचे संपादक रवी बेळगेरे (वय 62) यांचे गुरुवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्व हरपले. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर बनशंकरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री येडियुराप्पा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
बेंगळूरच्या पद्मनाभनगर येथील हाय बेंगळूर साप्ताहिकाच्या कार्यालयात गुरुवारी रात्री झोपी गेल्यानंतर त्यांना 12 च्या सुमारास हृदयविकाराचा झटका बसला. कार्यालयातील कर्मचाऱयांनी त्यांना तातडीने अपोलो इस्पितळात दाखल केले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.
15 मार्च 1958 रोजी बळ्ळारी येथे त्यांचा जन्म झाला. धारवाड विद्यापीठातून त्यांनी एम. ए. पदवी संपादन केली. त्यानंतर कन्नड भाषेतील लंकेश पत्रिके, संयुक्त कर्नाटक, कर्मवीर या वृत्तपत्रांमध्ये काम केले. 1995 मध्ये त्यांनी हाय बेंगळूर साप्ताहिकाची सुरुवात केली. ‘ओ मनसे’ या पाक्षिकाचेही ते संपादक होते.
केवळ पत्रकार, संपादक म्हणूनच नव्हे तर उत्तम लेखक, निवेदक म्हणूनही ते लोकप्रिय होते. हिमालयन ब्लंडर, भीमा तिरद हंतकरू, नी हिंग नोडबेड नन्न, डी कंपनी, इंदिरेय मग संजय, ब्लॅक फ्रायडे, कल्पनाविलास, गोळीबार, कादंबरी, माटगाती, सर्पसंबंध, गॉडफादर, कामराज मार्ग आदी साहित्यकृतींची रचना रवी बेळगेरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे ‘एंदु मरेयद हाडू’ या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे निवेदक म्हणूनही त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी बेंगळूरमध्ये प्रार्थना शाळेची स्थापना करून अनेक गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची सोय केली होती. केंपेगौडा पुरस्कार, प्रसारमाध्यम अकादमीचा पुरस्कार, राज्योत्सव पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आपल्या ‘क्राईम डायरी’ कार्यक्रमातून त्यांनी अंडरवर्ल्ड गुन्हेगारीविषयीचे अनेक सत्य जनतेसमोर आणले होते. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.









