कोरोना संसर्गासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचना
स्थलांतरित कामगारांना होणारा कोरोनाचा संसर्ग, त्यांच्यापासून इतरांमध्ये होणारा या रोगाचा प्रसार आणि अशा कामगारांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, तसेच विविध देशांच्या सरकारांनी यासंबंधी काय पावले उचलावीत, या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या संघटनेच्या सर्व सदस्य देशांनी त्यांचे पालन करावे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
कोरोना काळात देशांतर्गत स्थलांतर करणारे कामगार आणि एका देशातून दुसऱया देशात स्थलांतर करणारे कामगार अशा स्थलांतरीत कामगारांच्या दोन श्रेणी आहेत. त्यांच्या संदर्भात या मार्गदर्शन सूचना असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जगभरातील अनेक स्थलांतरित कामगारांना असुरक्षित आणि अनोंदणीकृत व अनधिकृत अशा प्रकारची कामे करावी लागतात. कामाच्या स्थानी शारिरीक अंतर किंवा इतर स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत. परिणामी, या कामगारांच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होतो. तसेच या कामगारांपासून नंतर स्थानिकांमध्येही या रोगाचा प्रसार होतो. युरोपमध्ये आफ्रिका आणि आशियायी देशांमधून आलेल्या स्थलांतरितांची संख्या फार मोठय़ा प्रमाणावर आहे. या खंडात कोरोना पसाराचे प्रमाणही मोठे असल्याचे दिसून येते.
देशांच्या सरकारांचे उत्तरदायित्व
अनेक देशांमध्ये अनधिकृत स्थलांतरीत मोठय़ा संख्येने आहेत. त्यांच्याकडे स्थलांतरणाची कायदेशीर कागदपत्रे नाहीत. अशा कामगारांमध्ये सांसर्गजन्य रोगांचा प्रसार झपाटय़ाने होऊ शकतो. कारण त्यांना अधिकृतता नसल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजीही त्यांचे मालक योग्य प्रकारे घेत नाहीत. त्यामुळे अशा देशांच्या सरकारांनी या कामगारांसाठी विशेष निधी स्थापन करून तसेच वारंवार त्यांच्या वस्त्यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी सर्वेक्षणे तसेच व्यापक चाचण्या करून आजारी कामगारांना इतरांपासून वेगळे करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
आजारीपणात मानधन
कोरोनाने आजारी असणाऱया कामगारांना सरकारांनी मानधन (सिक पे) द्यावे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय होईल. मालकांनाही असे मानधन देण्यास भाग पाडावे. अशा कामगारांना वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय साधने पुरविण्यासाठी विशेष कक्षांची व्यवस्था करावी, असेही संघटनेने सुचविले आहे.
अडकलेल्या कामगारांसाठी
कित्येक देशांनी कोरोना काळात आपल्या सीमा स्थलांतरासाठी बंद केल्या आहेत. त्यामुळे या देशांमध्ये बेकायदा येऊ इच्छिणारे स्थलांतरीत सीमारेषांवरच अडकून पडले आहेत. त्यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे मानवतेच्या भूमिकेतून संबंधित देशांच्या सरकारांनी त्यांना साहाय्य करावे. जेणेकरून कोरोनाचा प्रसार टाळता येईल, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
सहकार्य हवे
ज्या देशातून स्थलांतर होते, ज्या माध्यमांमधून होते आणि ज्या देशांमध्ये स्थलांतर होणार आहे, या तिन्ही संबंधितांमध्ये परस्पर संपर्क व सहकार्य असणे आवश्यक आहे. ज्या देशांमधून स्थलांतर होणार आहे तेथेच ते रोखण्यात आले तर परिस्थिती सुकर होऊ शकते, असे सुचविण्यात आले आहे. प्रबोधन करा
स्थलांतरीत कामगारांनी, स्थलांतर होत असताना आणि स्थलांतर झाल्यानंतर कशा प्रकारे स्वतःचा कोरोनापासून बचाव करावा यासंदर्भात त्यांचे प्रबोधन करण्याची व्यवस्था संबंधित राष्ट्रांनी करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक देशाने आपल्या आरोग्य प्राधिकरणांना अशा कामगारांची काळजी कशी घ्यावी यासंबंधी सूचना कराव्यात. या सूचनांचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवावे, असेही संघटनेने आपल्या अहवालात सुचविले आहे.









