प्रतिनिधी/ चिपळूण
गुहागर व चिपळूण येथील प्रलंबित तालुका क्रीडा संकुलांची कामे महिनाभरात पूर्ण करून 26 जानेवारी रोजी दोन्ही संकुलांच्या उद्घाटनाची तयारी करा, अशा सूचना आमदार भास्कर जाधव व आमदार शेखर निकम यांनी तालुका क्रीडा संकुल समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱयांना केल्या. यामुळे ही दोन्ही कामे लवकरच मार्गी लागून ती लवकरच सुरू होण्याच्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
चिपळूण पंचायत समितीच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक झाली. यावेळी चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गुहागरच्या तहसीलदार लता धोत्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोराडेकर, क्रीडा संकुलांच्या कामांचे ठेकेदार प्रतिनिधी सच्चिदानंद बांबाडे यांच्यासह चिपळूण व गुहागरचे गटविकास अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, पोलीस प्रमुख यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार जाधव यांनी दोन्ही क्रीडा संकुलांचा आढावा घेतला तेव्हा बांधकामांतील त्रुटींमुळे काम पूर्णत्वास गेलेले नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बोराडेकर यांनी सांगितले. याबाबत ठेकेदारास त्यांनी विचारले असता त्यांनी आम्ही काम पूर्ण करून द्यायला तयार आहोत, पण झालेल्या कामांपैकी काही बिले काढलेली नसल्यामुळे काम थांबले असल्याचे सांगितले. यावर क्रीडा अधिकारी बोराडेकर यांनी या कामासाठी नेमलेल्या कोल्हापूर येथील आर्कीटेक्टची मुदत संपल्यामुळे तो येथे येण्यास तयार नसल्याची माहिती दिली. त्यावर आमदार जाधव यांनी तिथूनच दूरध्वनीवरून आर्कीटेक्टशी संपर्क साधला आणि मुदत संपली असली तरी दोन्हीठिकाणची आपली कामे पूर्ण करून द्यावीत, अशी विनंती केली. संबंधित आर्कीटेक्टनेही दिवाळी होताच लगेच येण्याचे मान्य केले.
तसेच दोन्ही क्रीडा संकुलांच्या ठिकाणी वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही महावितरणकडे मागणी केली आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याचे अधिकाऱयांनी सांगताच आमदार जाधव यांनी तत्काळ महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून हाही प्रश्न मार्गी लावला. त्याचवेळी ठेकेदाराचे झालेल्या कामांचे पैसे अदा करण्यात यावेत, अशीही सूचना त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱयांना केली. त्याचवेळी अन्य कामांबरोबरच दोन्ही क्रीडा संकुलांच्या इमारतींवर शेड आणि पन्हळी टाकण्यास ठेकेदारास सूचित केले. दोन्ही क्रीडा संकुलांच्या ठिकाणी मार्गदर्शक नेमण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.









