पणजीसह राज्यभरातील सर्व बाजारपेठा ओव्हरफ्लो
प्रतिनिधी/ पणजी
दिव्यांच्या… आनंदाच्या व अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱया दीपावली उत्सवास आज शुक्रवारी सायंकाळपासून प्रारंभ होत आहे. तमाम गोमंतकीय जनता या उत्सवाच्या स्वागतास सज्ज झाली आहे. संपूर्ण राज्यभर दिव्यांचा झगमगाट सुरु होत असून राज्यात दीपावली उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या नरकासुर प्रतिमा आज दुपारपर्यंत सज्ज होतील. उद्या शनिवारी पहाटे या नरकासूर प्रतिमांचे दहन केले जाईल आणि घरोघरी पणत्या प्रज्वलनाने दिवाळी उत्सवाला खरा अर्थाने प्रारंभ होईल.
आजपासून पुढील 15 दिवस राज्यात दिव्यांचेच राज्य. राज्यातील जनता कोरोना महामारीवर मात करीत दिवाळी उत्सवाच्या स्वागताला सज्ज झाली आहे. गुरुवारी राज्यातील बाजरपेठा माणसांनी तुडूंब भरल्या होत्या. जागो जागी व चौकाचौकात रंगीबेरंगी आकाशकंदील विक्रीसाठी आलेले आहेत. या आकाशकंदीलांची विक्री देखील मोठय़ा प्रमाणात होत आहे.
सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई सुरु
अनेक खाजगी आस्थापनांनी शोरुम वा आपल्या दुकानांवर केलेली विद्युत रोषणाई देखील आकर्षित ठरली आहे. कोरोना महामारीमुळे संकटात व अडचणीत सापडलेला गोमंतकीय मोठय़ा उत्साहात व आनंदात दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे.
पारंपरिक पणत्यांचेही महत्व अबाधित

मोठय़ा प्रमाणात विद्युत दिव्यांची आरास केली जात असली तरीही पारंपरिक पणत्यांचे महत्त्वही कमी झालेले नाही. उलटपक्षी गेल्या दोन तीन वर्षात पणत्यांची विक्री उच्चांकी होत चाललेली आहे. प्रत्येकजण आपल्या दारात पणत्या लावून दिवाळीचे स्वागत करतो. राज्यातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये रंगबिरंगी आकर्षक पारंपरिक मातीच्या पणत्या विक्रीस आलेल्या आहेत.
गोमंतकीय गावठी पोहय़ांची चव न्यारीच…
दिवाळी म्हटली की ‘पोहे’ आलेच. किंबहुना पोह्यांशिवाय दिवाळी अशक्य. गोव्यातील बाजारपेठामध्ये मोठय़ा प्रमाणात पोहे विक्रीस आलेले आहेत. दिवाळीचे गोव्यातील वैशिष्टय़ म्हणजे गोड, तिखट, आंबट असे विविध प्रकारच्या पोह्यांचा फराळ एकमेकांना दिला जातो. व त्यातून सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले जातात. अलिकडच्या काळात गावठी पोह्यांची मागणी बरीच वाढलेली आहे. यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक गावठी लाल पोहे बाजारात विक्रिस आलेले आहेत आणि ग्राहकांची त्यावर अक्षरशः उडीच पडलेली आहे.
गोव्याबरोबरच बाहेरच्या पणत्यांचीही होतेय विक्री
गोव्यात पणत्यांची निर्मिती करणाऱयांची संख्या फारच कमी झाल्याने रामनगर, लोंढा व बेळगाव जिह्यातील अनेक कुंभारांनी गोव्यात आकर्षक मातीची विविध भांडी तसेच दिवे आणि पणत्या विक्रीची दुकाने मांडली आहेत. त्यांना ग्राहकही मोठय़ा संख्येने लाभलेला आहे.
गावठी लाल पोह्यांची मागणी वाढली
यावर्षी पोह्यांचे उत्पादन वाढलेले आहे. पूर्वीच्या काळात केवळ दिवाळी दिवशीच पोहे खाल्ले जायचे. आता कधीही सकाळच्या न्याहारीवेळी पोहे खाल्ले जातात. बटाटा पोहे ही पौष्टिक न्याहारी आहे. वर्षभर मिळणाऱया सफेद पोहय़ांपेक्षा भातापासून तयार करण्यात येणारे खास गावठी लाल पोहे हे गोव्यातील दिवाळीचे वैशिष्टय़ा आहे. सुके पोहे, नारळाच्या रसातील पोळे, गुळान कालवलेले पोहे, तिखट पोहे अशा अनेक प्रकारचे पोहे दिवाळची उत्सवात खाल्ले जातात.
राजधानी पणजीसह फोंडा, म्हापसा, मडगाव, वास्को या प्रमुख शहरांबरोबरच पेडणे, शिवोली, डिचोली, सांखळी वाळपई, सांगे, केपे, काणकोण इत्यादी ठिकाणच्या बाजारपेठाही दिव्यांच्या रोषणाईने झगमगलेल्या आहेत.
भव्य नरकासुर प्रतिमा

गुरुवारी नरकासुर प्रतिमांवर शेवटचा हात फिरविला जात होता. गोव्यातील दिवाळी उत्सवाचे खास आकर्षण ठरलेल्या नरकासुर प्रतिमांची उभारणी संपूर्ण राज्यभर चालू आहे. गुरुवारी बहुतांश प्रतिमा रंगवून सज्ज झाल्या होत्या. आज सांयकाळपर्यंत त्यावर मुखवटे चाढविले जातील. त्यानंतर रात्रभर जागरण करुन शनिवारी पहाटे नरकासुर प्रतिमांचे दहन केले जाईल. त्याचबरोबर घरोघरी पणत्या प्रज्वलित करुन, अभ्यंगस्नानाने दिवाळी उत्सवाला प्रारंभ होईल. आज सायंकाळपासून म्हणजेच धनत्रयोदशीच्या निमित्त प्रत्येकाच्या दारावर रंगबिरंगी आकाशकंदिल दृष्टीस पडतील.









