स्पर्धेतील कंपन्यांना टक्कर देण्याची जिओची तयारी : 33 हजार 737 कोटींना व्यवहार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज इंटरनेट कंपनी आणि गुगल सर्च इंजिन अशी ओळख असणारी गुगल कंपनी देशातील प्रसिद्ध कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्ममधील 7.73 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचे संकेत आहेत. भारतीय प्रतिस्पर्धी आयोग (सीसीआय) यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठीची घोषणा करण्यात आल्याची माहिती एका ट्वीटमधून दिली आहे.
दोन्ही कंपन्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून गुगल कंपनी रिलायन्स जिओमधील 7.73 टक्क्यांची हिस्सेदारी जवळपास 33,737 कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याची घोषणा जुलै महिन्यातच केली होती.
एका मर्यादेपेक्षा अधिकच्या व्यवहारांसाठी सीसीआयला मंजुरी द्यावी लागणार आहे. आयेगाने व्यापारी जगतामधील सर्व क्षेत्रातील प्रतिस्पर्धक संख्या घटण्याच्या वेगावर अंकुश लावण्यास मदत मिळणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
इंडिया डिजिटलायजेशन फंड भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला तेजी देण्याचे काम वेगाने करीत असल्याचे चित्र या गुंतवणुकीमधून स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी पाच ते सात वर्षात भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होत, विविध गुंतवणूक, पार्टनरशिप आणि ऑपरेशनल, पायाभूत सुविधांसह इकोसिस्टममधील गुंतवणुकीचा लाभ होणार असल्याची माहिती आहे.
दोघांमध्ये स्मार्टफोन निर्मितीसाठी करार
गुगल आणि जिओ प्लॅटफॉर्म यांच्यात एकत्रितपणे स्वस्त स्मार्टफोनची निर्मिती करण्यावर एक व्यावसायिक करार झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम आणि प्ले स्टोअरचा अधिकतर उपयोग केला जाण्याचे संकेत आहेत.