पुलाची शिरोली / वार्ताहर
कोल्हापूरच्या जनतेचे कर्तृत्व, दातृत्व आणि सामाजिक बांधिलकी ही राज्यात भारी आहे. असे मत करवीरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केले. ते शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने स्मॅक सभागृहात आयोजित विशेष सन्मानपञ वाटप कार्यक्रमात बोलत होते. जेष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन, अध्यक्ष अतुल पाटील व स.पो.नि. किरण भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, मागील वर्षी अतिवृष्टीने पंचगंगा नदीला पूर आला होता. यामुळे अनेक राज्यांना जोडला गेलेल्या पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. याचा परिणाम अनेक घटकांवर झाला होता. या संकट समयी कोल्हापूरच्या जनतेने सामाजिक बांधिलकी जपत संकटातील लोकांना मदतीचे हात पुढे केले.
त्यानंतर चालू वर्षी कोरोनाचे महासंकट आले. या संकटाला सामोरे जात असताना समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी दवाखाने, पोलीस प्रशासन, शासकीय यंत्रणा यांना मदतीचा हात दिला. या महामारीचा फैलाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक गाव एक गणपती, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा , सण, उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याने आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली. असे अमृतकर यांनी सांगितले.
यावेळी कोविड १९ च्या महामारीमध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या पत्रकार, सरपंच, उद्योजक, पोलीस पाटील यांचा प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जेष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन, अतुल पाटील, सरपंच शशिकांत खवरे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत स.पो.नि. किरण भोसले यांनी केले, प्रास्ताविक स.पो.नि. रमेश ठाणेकर यांनी केले.आभार फौजदार अतुल लोखंडे यांनी मानले.









