प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालविली आहे. याचाच एक भाग म्हणून 17 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांची बैठक बोलावली आहे.
राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. मात्र, निवडणूक आयोगाने डिसेंबर अखेरपर्यंत निवडणूक घेण्याची तयारी चालविली आहे. आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱयांची बैठक बोलावली आहे. बेळगाव आणि म्हैसूर विभागातील जिल्हाधिकाऱयांची बैठक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. तत्पूर्वी, यादिवशी सकाळी 11.30 ते 1.30 या वेळेत बेंगळूर आणि गुलबर्गा विभागातील जिल्हाधिकाऱयांची बैठक होणार आहे. बैठकीत जिल्हा पंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांनाही उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
कोरोना परिस्थिती, महापूराच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राची स्थिती, मतदार यादीसंबंधी तक्रारी, निवडणूक अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची नेमणूक, प्रशिक्षण, मतदारयादी व निवडणुकीची तयारी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, मतदारांमध्ये जागृती करण्यासंबंधी बैठकीत चर्चा केली जाणार आहे.









